मनोज गडनीस, मुंबई : एका सोने व्यापाऱ्याकडून २२ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या (सीजीएसटी) दोन अधिक्षक व एका अधिकाऱ्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या अधिकाऱ्यांनी लाच स्वीकारण्यापूर्वीच सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश शर्मा व अंकुर गोद्यान अशी या दोन अधिक्षकांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, जीएसटी विभागाच्या मुंबईतील एअर इंडिया विभागात हे अधिकारी कार्यरत आहेत. दक्षिण मुंबईतील झवेरी बाजार येथील एका सोने व्यापाऱ्याशी संबंधित हे प्रकरण आहे. या व्यापाऱ्याला जीएसटी संदर्भात संबंधित कार्यालयाकडून नोटिस जारी करण्यात आली होती. या व्यापाऱ्याने त्या नोटिशीच्या अनुषंगाने सर्व कागदपत्रे या अधिकाऱ्यांना सादर केल्याचा देखील दावा सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडे केला. मात्र, या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी २२ लाख रुपयांची मागणी संबंधित व्यापाऱ्याकडे केली तसेच १५ मार्च रोजी त्याच्या कार्यालयावर छापेमारी देखील केली.