२२ हजार ३३४ झाडांची आतापर्यंत छाटणी; पालिकेच्या ४ हजार ९०९ आस्थापनांना नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 09:51 AM2024-04-23T09:51:26+5:302024-04-23T09:56:17+5:30
पावसाळापूर्व खबरदारी म्हणून धोकादायक ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांच्या छाटणीची कामे पालिकेच्या उद्यान विभागाने हाती घेतली आहेत.
मुंबई : पावसाळापूर्व खबरदारी म्हणून धोकादायक ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांच्या छाटणीची कामे पालिकेच्या उद्यान विभागाने हाती घेतली आहेत. आतापर्यंत २२ हजार ३३४ झाडांच्या फांद्यांची छाटणी पूर्ण झाली आहे. तर, खासगी तसेच शासकीय मालकीच्या परिसरामधील झाडांची छाटणी वेळेत पूर्ण करून घेण्यासंदर्भात ४ हजार ९०९ आस्थापनांना नोटीस जारी करण्यात आले आहे.
पालिका क्षेत्रात २९ लाख ७५ हजार झाडे असून, यापैकी १५ लाख ५१ हजार १३२ एवढी झाडे खासगी संस्थांच्या आवारांमध्ये आहेत. जवळपास १० लाख ६७ हजार ६४१ झाडे शासकीय इमारती तसेच आस्थापनांच्या परिसरांमध्ये आहेत. एकूण झाडांपैकी १ लाख ८६ हजार २४६ झाडे ही रस्त्यांच्या कडेला आहेत. त्यापैकी १ लाख ४८ हजार १६९ हजार झाडांची छाटणी अपेक्षित असून, त्यापैकी १९ एप्रिल अखेर २२ हजार ३३४ झाडांची छाटणी झाली आहे. ७ जूनपर्यंत उर्वरित झाडांची छाटणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट उद्यान विभागाने ठेवले आहे. मृत आणि कीड लागलेली तसेच वाकलेली ४३३ झाडे सर्वेक्षणादरम्यान आढळली आहेत. यापैकी ३८६ झाडे काढण्यात आल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी सांगितले.
...तर पालिका जबाबदार नाही
१) मुंबईतील धोकादायक झाडांची छाटणी करण्यासाठी पालिकेच्या वतीने मोहीम सुरू असताना संबंधित भागांमध्ये त्या-त्या भागाच्या पालिका विभाग कार्यालयांकडून नागरिकांना आधीच माहिती दिली जाते. तरीही छाटणीच्या कामामध्ये रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांचा अडथळा येत आहे.
२) प्रशासनाने आवाहन करूनही जर नागरिकांनी संबंधित ठिकाणांहून वाहने काढली नाहीत आणि छाटणीदरम्यान दुर्दैवाने वाहनांचे नुकसान झाले, तर प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
पालिकेशी करा संपर्क-
शासकीय-निमशासकीय संस्था असणाऱ्या झाडांची निगा घेण्याची सर्व जबाबदारी मालकाची किंवा वापरकर्त्याची असते. अशा प्रकारच्या खासगी जागेतील झाडांची छाटणी करावयाची असल्यास विभाग कार्यालयातील उद्यान अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.