मुंबई : निवडणुकीच्या काळात लोकानुनय करणारी किंबहुना लोकांना खुश करून त्यांच्यावर प्रभाव टाकणारी कामे काढली जाऊ नयेत यासाठीच कोणतीही कामे करताना निवडणूक आयोगाची मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेला नियोजित कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी आयोगाकडे सदर करावे लागले आहेत. खड्डे बुजवणे, नालेसफाई आदी कामांसाठीही आयोगाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. विविध कामांचे २२८ कोटी रुपयांचे प्रस्ताव पालिकेने मंजुरीसाठी आयोगाकडे धाडले आहेत.
आपत्कालीन परिस्थिती किंवा पावसाळ्यापूर्वीची कामे निवडणूक काळात पूर्ण होणे अपेक्षित असतात. खड्डे बुजवण्याच्या कामासाठीही आयोगाची परवानगी का घ्यावी लागते, अशी विचारणा पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली असता, कोणती कामे निवडणूक काळात करावीत, याचे स्पष्ट निर्देश आयोगाच्या आचारसंहितेत आहेत. आपत्कालीन काळातील कामाशिवाय अन्य कामे या काळात अपेक्षित नाहीत. त्यातही अत्यावश्यक कामे कोणती, ही कामे खरोखरच अत्यावश्यक आहेत का, याची छाननी आयोगाकडून केली जाते. त्यानंतरच परवानगी दिली जाते. त्यामुळे खड्डे भरणीच्या कामासाठीही परवानगी घ्यावी लागते.
खड्डे भरण्याचे काम का करावे लागणार आहे, ते किती महत्त्वाचे आहे, हे पटवून द्यावे लागते. निवडणूक काळात लोकानुनय करणारी कामे काढून लोकांवर एका अर्थाने लोकांवर प्रभाव टाकणारी कामे काढली जाऊ नयेत, हे आचारसंहितेत अभिप्रेत आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
हिरवा कंदील मिळाल्यानंतरच निविदा-
१) पालिकेने याआधी ज्या कामांच्या निविदा काढल्या आहेत, ती कामे आयोगाच्या कचाट्यातून सुटली आहेत. मात्र, यापुढे जी कामे आवश्यक असतील त्या कामांसाठी आयोगाकडे जावेच लागणार आहे.
२)आयोगाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्या कामांच्या निविदा काढल्या जातील. त्यानंतर कामांना सुरुवात होईल. त्यामुळे येत्या काही दिवसांत नालेसफाई, नाल्यांतील गाळ काढणे, त्याची विल्हेवाट लावणे, गाळ वाहून नेण्यासाठी वाहनांची व्यवस्था करणे या कामांना वेग येईल.
३) पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाची डागडुजीही पालिका हाती घेणार आहे. त्यासाठी आयोगाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.