Join us

सायबर हेल्पलाइनमुळे मिळाले २६ कोटी; आमिषाला बळी पडून  गमावले साडेचार कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 9:49 AM

ठगांच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन. 

मुंबई : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून आकर्षक परतावा मिळवून देण्याच्या सायबर ठगांच्या आमिषाला बळी पडून साडेचार  कोटी रुपये गमावलेल्या एका व्यक्तीने तत्काळ सायबर पोलिसांच्या हेल्पलाइनला काॅल केला आणि त्याने गमावलेल्या रकमेतील ३.७० कोटी रुपये अवघ्या ४८ तासांत वाचविण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. अशाच प्रकारे मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने गेल्या वर्षभरात हेल्पलाइनच्या मदतीने २६ कोटी ४८ लाख परत मिळवून दिले.

सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांनी ४ जानेवारीला सायबर पोलिसांच्या १९३० हेल्पलाइनशी संपर्क साधला. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्कात असलेल्या सायबर ठगांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकूण चार कोटी ५६ लाख ८४ हजार ३५४ रुपये घेतले. मात्र, त्यांना आकर्षक परतावा दिला तर नाहीच, मात्र भरलेली मूळ रक्कमही परत केली नाही.

सायबर पोलिसांनी तत्काळ एनसीसीआर पोर्टलवर तक्रार दाखल करून घेत लगेचच बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. फसवणूक झालेल्या रकमेपैकी ३ कोटी ७० लाख ४३ हजार रुपये आरोपींनी वापरलेल्या बँक खात्यात गोठविण्यात यश आले. याप्रकरणी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली बँक खाती, मोबाइल क्रमांक आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सावधान, अशी होते फसवणूक :

क्रेडिट कार्ड, ई-मेल फिशिंग, ऑनलाइन जॉब फ्रॉड, क्लासिफाइड फ्रॉड, केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक, विवाह संकेतस्थळावरून ओळख करून फसवणूक, समाजमाध्यमांवरून ओळख करून फसवणूक, ओटीपी फसवणूक, सेक्सटॉर्शनसारख्या विविध फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये फसवणूक करण्यात आलेली ही रक्कम आहे.

  मुंबई शहरातील नागरिकांची सायबर गुन्ह्यामध्ये फसवणूक झालेली रक्कम संबधित बँक खात्यामध्ये गोठविण्यासाठी मुंबई गुन्हे शाखाअंतर्गत १९३० हेल्पलाइन कार्यान्वित करण्यात आली आहे. 

  याद्वारे सायबर गुन्ह्यात हस्तांतरित झालेली रक्कम तत्काळ गोठवण्याचे काम करण्यात येते. अशाचप्रकारे सायबर ठगांच्या जाळ्यात अडकलेल्या नागरिकांचे गेल्या वर्षभरात  २६ कोटी ४८ लाख २२ हजार २०९ रुपये १९३० या हेल्पलाइनच्या माध्यमातून विविध बँक खात्यात गोठविण्यात मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला यश आले होते. 

  आपल्यासोबत सायबर फसवणुकीचा प्रकार घडल्यास १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी केले आहे.

टॅग्स :धोकेबाजीपोलिस