कचरा फेकणाऱ्या ७२० जणांनी मोजला सुमारे २७ लाखाचा दंड
By जयंत होवाळ | Published: January 2, 2024 08:00 PM2024-01-02T20:00:02+5:302024-01-02T20:00:12+5:30
सध्या संपूर्ण मुंबईत संपूर्ण स्वच्छता अभियान राबवले जात असून त्या अंतर्गत कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
मुंबई: सध्या संपूर्ण मुंबईत संपूर्ण स्वच्छता अभियान राबवले जात असून त्या अंतर्गत कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. ही मोहीम सुरु झाल्यापासून आतापर्यंत कचरा टाकणाऱ्या ७२० जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २७ लाख १९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सर्वात जास्त कारवाई शहर विभागातील चंदनवाडी आणि गिरगाव भागात झाली आहे. सर्वात कमी कारवाई वांद्रे आणि सांताक्रूझ विभागात झाली असली तरी या ठिकाणी ६८ जणांवर कारवाई करून सर्वात जास्त म्हणजे सुमारे चार लाख ७९ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
नोव्हेंबर महिन्यापासून मुंबईत 'डीप क्लिनिंग' मोहीम सुरु झाली आहे. तर, संपूर्ण स्वच्छता मोहीम आणखी व्यापक करण्यात आली असून हे अभियान राज्यभर राबवले जाणार आहे. स्वच्छ मोहिमेअंतर्गत कचरा टाकणे आणि कचरा जाळणे यावर जास्त भर देण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना कोणी आढळून आल्यास दंडात्मक कारवाई होत आहे. 'सी' वॉर्डात जास्त कारवाई, तर पश्चिम उपनगरात जास्त दंड वसूल 'सी' वॉर्डातील गिरगाव, चंदनवाडी आणि परिसरात कचरा टाकणाऱ्या १७० जणांवर कारवाई करून ३५ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या विभागात कारवाई जास्त लोकांवर झाली असली तरी दंडाची रक्कम मात्र फार मोठी नाही.
कोणत्या प्रकारचा आणि किती प्रमाणत कचरा टाकला जातो, त्यावर दंडाची रक्कम ठरते. या वॉर्डाच्या तुलनेत पश्चिम उपनगरात वांद्रे आणि सांताक्रूझ भागात फक्त ६८ जणांवर कारवाई झाली, मात्र सुमारे ४ लाख ७८ हजार रुपये एवढा घसघशीत दंड वसूल केला गेला. मालाड पी-उत्तर विभागात २१ लोकांवरील कारवाईत २ लाख १० हजार रुपयांचा दंड आकारला गेला. तर एच-पूर्व विभागात २९ लोकांवर कारवाई झाली आणि २ लाख ९० हजार रुपये दंड घेण्यात आला. तर, के -पूर्व आणि के- पश्चिम विभागात अनुक्रमे १ लाख ९२ हजार आणि २ लाख ४१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला या दोन्ही विभागात अनुक्रमे ३९ व २० जणांवर कारवाई झाली.
पूर्व विभाग
मुलुंड 'टी' वॉर्डात २७ लोकांवर कारवाई झाली. या ठिकाणी २ लाख ७० हजार रुपये दंड घेण्यात आला. कुर्ला 'एल' वॉर्डात ५९ लोकांवरील कारवाईतून २ लाख ६८ हजार रुपये दंड गोळा झाला