Join us

मुंबादेवी, महालक्ष्मी मंदिरासाठी २८० कोटी; मुंबई पालिका करणार विकास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 9:58 AM

जगन्नाथ शंकरशेठ स्मारकासाठी ३५ कोटी, मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय.

मुंबई : महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी मुंबई महापालिकेने ६० कोटींचा निधी देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबादेवी मंदिराच्या सौंदर्यीकरणासाठी २२० कोटी, जगन्नाथ शंकरशेठ स्मारकासाठी ३५ कोटी, तर भागोजी शेठ कीर स्मारकासाठी २० कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, असाही निर्णय शिंदे यांनी घेतला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबादेवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, हाजीअली दर्गा, जगन्नाथ शंकरशेठ स्मारक व भागोजी शेठ कीर स्मारकाबाबत बैठक झाली. त्यात हे निर्णय घेण्यात आले.

सह्याद्री अतिथीगृहातील बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, नाना शंकरशेठ यांच्या कुटुंबातील विलास शंकरशेट, जिमी शंकरशेठ आणि पद्मिनी शेठ आदी उपस्थित होते.

मुंबईतील महालक्ष्मी, मुंबादेवी, हाजी अली ही प्राचीन देवस्थाने आहेत. त्यांच्या सौंदर्यीकरणासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देतानाच भाविकांना सुलभ दर्शनासाठी सोयीसुविधा उपलब्ध कराव्या. महालक्ष्मी, मुंबादेवी मंदिराचा विकास करताना परिसरातील मंदिरांचेही सौंदर्यीकरण करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मंदिर परिसरात वाहनतळाची सोय करताना स्वच्छतागृहांचीही व्यवस्था करावी. सौंदर्यीकरण करतानाच प्राचीन स्थापत्यशैलीचाही वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करा -  यावेळी महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर, हाजीअली दर्गा, जगन्नाथ शंकरशेठ स्मारक व भागोजी शेठ कीर स्मारकाच्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. जगन्नाथ शंकरशेठ स्मारक वडाळा येथे उभारण्यात येत असून मुंबई महापालिकेने त्यासाठी तातडीने ३५ कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा आणि स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करावे, असे मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला सांगितले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाएकनाथ शिंदेमुंबादेवी