Join us

कंत्राटदाराला 3 कोटींचा दंड; गोखले पुलाचा दुसरा गर्डर बसविण्यासाठी पालिकेकडून मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 10:57 AM

गोखले पुलाच्या नियोजनाचे वेळापत्रक पुन्हा कोलमडल्याचे दिसून आले आहे.

मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या दुसऱ्या गर्डरचे सर्व सुटे भाग मुंबईत कंत्राटदाराला दिलेल्या मुदतीत न पोहचल्याने दुसरा गर्डर बसविण्याची मुदत हुकली आहे. यामुळे ६ महिने लांबणीवर गेले आहे. विलंबामुळे कंत्राटदाराला जवळपास ३ कोटींहून अधिक दंड आकारण्यात आला असून दुसऱ्या गर्डरसाठी १४ नोव्हेंबरची वाढीव मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे गोखले पुलाच्या नियोजनाचे वेळापत्रक पुन्हा कोलमडल्याचे दिसून आले आहे.

गोखले पुलाची एक बाजू २६ फेब्रुवारी रोजी सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना दुसरी बाजू सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. बांधकाम सुरू झाल्यानंतर एक बाजू सुरू होण्यास १५ महिने लागले. एप्रिलच्या सुरुवातीला दुसऱ्या बाजूच्या गर्डरचे भाग दिल्लीहून आणण्यास सुरुवात झाली. 

नोव्हेंबरपर्यंत नियोजन -

३१ मेपर्यंत गर्डर स्थापन करून रस्ते तयार करण्याचे व ३१ डिसेंबरपर्यंत संपूर्ण पूल खुला करण्याचे नियोजन होते. मात्र, दुसऱ्या गर्डरचे काही भाग आले, ते जोडण्याचे काम सुरू आहे.  मात्र, सर्व भाग आले नसल्याने हे सगळे नियोजन कोलमडले आहे. आता नवीन मुदतवाढीनुसार दुसरा गर्डर १४ नोव्हेंबरपर्यंत बसवण्यात येईल. त्यानंतर रेल्वेच्या हद्दीतील कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण पूल वाहतुकीला खुला होण्याचा मुहूर्त २०२५ पर्यंत लांबणीवर पडला आहे.

कारणे असमाधानकारक-

पुलाच्या दुसऱ्या गर्डरचे सुटे भाग मुंबईत येण्यास उशीर झाल्यामुळे पालिका प्रशासनाने कंत्राटदाराकडून खुलासा मागवला होता. त्यातील काही कारणे प्रशासनाला पटलेली नसून मागण्यात आलेल्या अतिरिक्त दिवसांसाठी दंड लावण्यात आला आहे. मूल्यमापन करून प्रत्येक आठवड्यासाठी ठरविण्यात आलेल्या दराप्रमाणे पालिका प्रशासनाने कंत्राटदाराला ३ कोटींहून अधिक दंड ठोठावला आहे. वाढीव मुदतीतही गार्डरचे काम पूर्ण न झाल्यास याहून जास्त दंड होऊ शकतो, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

असे होणार गर्डर स्थापन-

गर्डरचे सर्व सुटे भाग आल्यानंतरच पुढील गर्डर लाँचिंगची आणि पूल खुली करण्याची सर्व कामे अवलंबून आहेत. गर्डर स्थापन करण्यासाठी क्रेन उभे करावे लागत असल्यामुळे आधी पोहोच रस्ते तयार करता येत नाहीत. सुटे भाग जोडल्यानंतर रेल्वेकडून रुळांवरील कामांसाठी ब्लॉक घेतला जाईल, त्यानंतर गर्डर स्थापन करून पोहोच रस्त्याची कामे केली जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अंबाला येथील कारखाना हा रेल्वे प्रशासनाने प्रमाणित केलेला आहे. त्यामुळे गर्डरचे सुटे भाग हे तेथूनच मागविण्यात आलेले आहेत. मात्र, याचे नियोजन फसल्यामुळे गोखले पूल खुला होण्याच्या वेळापत्रकाला याचा फटका बसला आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाअंधेरी