पालिकेकडे वर्षअखेर ३ हजार १९५ कोटी कर जमा; पश्चिम उपनगरात सर्वाधिक करवसुली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 09:51 AM2024-04-02T09:51:06+5:302024-04-02T09:54:37+5:30
मुंबई महानगरपालिकेकडून ३१ मार्चपर्यंत ३ हजार १९५ कोटी ९१ लाख ११ हजार रुपयांचा मालमत्ता कर संकलन करण्यात आला आहे.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून ३१ मार्चपर्यंत ३ हजार १९५ कोटी ९१ लाख ११ हजार रुपयांचा मालमत्ता कर संकलन करण्यात आला आहे. सर्वाधिक ३३६.४५ कोटींचा मालमत्ताकर संकलन हे ‘एच पूर्व’ विभागातून तर सगळ्यात कमी मालमत्ता २२ कोटी कर संकलन बी विभागातून झाले आहे. याबाबतची माहिती कर निर्धारण व संकलन खात्याचे सहआयुक्त सुनील धामणे यांनी दिली.
करनिर्धारण व संकलन विभागातर्फे आर्थिक वर्ष २०२३-२०२४ ची सुधारित मालमत्ता कराची बिले फेब्रुवारी २०२४ अखेरीस पाठविण्यात आली. नागरिकांनी वेळेत मालमत्ता कराचा भरणा करावा, यासाठी साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुट्टींच्या दिवशी नागरी सुविधा केंद्रे सुरू ठेवण्यात आली.
पश्चिम उपनगरात सर्वाधिक करवसुली -
शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तिन्ही भागांतील मालमत्ता कर संकलनाचा विचार केल्यास सर्वाधिक कर संकलन हे पश्चिम उपनगरांमध्ये १,५९०.०९ कोटी रुपये, शहर भागात ९१७.०५ कोटी रुपये आणि पूर्व उपनगरांमध्ये ६७८.४२ कोटी रुपये इतके मालमत्ता कर संकलन झाले आहे.
आर्थिक वर्षातील (२०२३-२०२४) प्रशासकीय विभागनिहाय मालमत्ता कर संकलन-
विभाग कर संकलन
ए १५३ कोटी ०१ लाख
बी २२ कोटी ३३ लाख
सी ४१ कोटी ९३ लाख
डी ११४ कोटी ४१ लाख
ई ६९ कोटी ४६ लाख
एफ दक्षिण ५७ कोटी ८५ लाख
एफ उत्तर ६९ कोटी २३ लाख
जी दक्षिण २५७ कोटी ११ लाख
जी उत्तर १३१ कोटी ७२ लाख
एच पूर्व ३३६ कोटी ४५ लाख
एच पश्चिम १८५ कोटी ५३ लाख
के पूर्व ३१७ कोटी ४८ लाख
विभाग कर संकलन
पी दक्षिण १६७ कोटी २१ लाख
पी उत्तर ११५ कोटी ०३ लाख
आर दक्षिण ८५ कोटी ७४ लाख
आर मध्य १०५ कोटी ०७ लाख
आर उत्तर ३९ कोटी ३० लाख
एल १३९ कोटी ३४ लाख
एम पूर्व ५५ कोटी ०८ लाख
एम पश्चिम ७३ कोटी
एन १०३ कोटी ०८ लाख
एस २२६ कोटी २२ लाख
टी ८१ कोटी ७० लाख
के पश्चिम २३८ कोटी २८ लाख
२ लाख ५३ हजार ६०५ जणांनी भरला कर -
एकूण मालमत्तांची संख्या ९ लाख ५५ हजार ३८ इतकी आहे. त्यापैकी ५०० चौरस फूट (४६.४५ चौरस मीटर) व त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱ्या निवासी इमारती, सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. या मालमत्तांची संख्या ३ लाख ५६ हजार ६५२ इतकी आहे. उर्वरित ५ लाख ९८ हजार ३८६ मालमत्तांना कर आकारणी केली जाते. २०२३-२४ मध्ये २ लाख ५३ हजार ६०५ मालमत्ताधारकांनी मिळून एकूण वर्षात ३ हजार १९५ कोटी ९१ लाख ११ हजार रुपयांचा कर भरणा केला आहे.