Join us  

मुंबईत शंभरी पार करणारे ३ हजार २५९ मतदार; सर्वाधिक मतदार ४० ते ४९ वयोगटांतील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 10:40 AM

भारत हा तरुणांचा देश आहे, असे म्हटले जात असले तरी वैद्यकीय विश्वातील प्रगतीमुळे नागरिकांचे आयुर्मान वाढले आहे.

मुंबई :  भारत हा तरुणांचा देश आहे, असे म्हटले जात असले तरी वैद्यकीय विश्वातील प्रगतीमुळे नागरिकांचे आयुर्मान वाढले आहे. त्यामुळे ७० वयापेक्षा अधिक वयोमर्यादा असणाऱ्यांचे प्रमाणसुद्धा अधिक आहे. मुंबईच्या अखत्यारीत येणाऱ्या दोन लोकसभेतील १० विधानसभेतल्या मतदारांचे वयोगट पाहिले असता ३ हजार २५९ मतदारांनी वयाची शंभरी पार केली आहे. सर्वाधिक मतदार ६,४६,६६९ असून, ते  ४० ते ४९ वयोगटातील असल्याचे निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीमधून  स्पष्ट होत आहे.  

शहरात एकूण २४,४७,८२६ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. या मतदारांनी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करावे म्हणून प्रयत्न केले जात आहे. धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. २३ एप्रिलपर्यंत नवीन मतदारांची नोंदणी सुरू राहणार आहे. त्यामुळे अजूनही मतदानाच्या यादीत सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. 

गेल्या काही दिवसात झालेल्या नोंदणीत १८-१९ वयोगटातील नव मतदारांची संख्या १८,१९३ इतकी अजून हा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या सर्व मतदारांनी मतदान करावे म्हणून निवडणूक विभागातर्फे घरोघरी जाऊन मोहीम राबविण्यात येत आहे. जर घराचा पत्ता बदलला असेल तर तो बदलून देण्याची सुविधासुद्धा  मतदान केंद्रांवर करण्यात आली आहे.  

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४मतदान