मुंबई : कंपनीचा विश्वास संपादन करत २९.८२ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सेल्स मार्केटिंग कर्मचाऱ्याविरोधात कंपनीच्या जनरल मॅनेजरने तक्रार दिली. त्यानुसार त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, साकीनाका पोलिस अधिक तपास करीत आहेत.
रँक इंटरनॅशनल कंपनीत तक्रारदार प्रशांत मेहता (४१) हे काम करतात. विशाल भारतीय हा त्यांच्या कंपनीत सप्टेंबर २०१७ मध्ये बिझनेस डेव्हलपमेंट आणि प्रॉडक्ट मार्केटिंग व सेल्सची जबाबदारी सांभाळत होता. त्याचे चांगले काम पाहून वर्षभरानंतर कंपनीने त्याला एक झोनची जबाबदारी सांभाळायला दिली. त्यात हैदराबाद, तेलंगणा आणि महाराष्ट्राचा काही भाग समाविष्ट होता.
हिशेब देणे केले बंद-
१) भारतीय हा हैदराबाद येथे राहून कंपनीचे काम सांभाळायचा. कंपनीकडून त्याला दिलेल्या सर्व प्रॉडक्टच्या डिलिव्हरी चलनवरून ग्राहकांना प्रॉडक्ट दाखवत कंपनीकडून सोन्या-चांदीचे दागिने, चेन तसेच सुटे भाग कुरिअरने पाठवायचा.
२) जानेवारी २०२४ नंतर भारतीय याने कंपनीला हिशेब देणे बंद केले. त्यामुळे कंपनीत त्याच्याकडून त्याला दिलेले सोन्या-चांदीच्या दागिने परत मागितले. त्यात तो टाळाटाळ करू लागला आणि अखेर चौकशीत त्याने २९ लाख ८२ हजार १७ रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले. त्यानुसार मेहता यांनी त्यांच्या कंपनीतर्फे भारतीय विरोधात तक्रार केल्यानंतर साकीनाका पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.