बेस्टच्या ताफ्यात ३,२०० बस; प्रवास होणार सुसह्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 10:11 AM2024-01-03T10:11:26+5:302024-01-03T10:11:59+5:30
पर्यावरणपूरक खरेदी, निविदा प्रक्रिया पूर्ण.
मुंबई : नव्या वर्षात बेस्टने आपल्या ताफ्यात ३२०० बसगाड्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बसची संख्या वाढवल्याने मुंबईतील प्रमुख अंतर्गत सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. ‘बेस्ट’च्या मालकीच्या बसगाड्यांचे आयुर्मान संपल्याने गाड्या भंगारात निघत आहेत. त्यामुळे नव्या वर्षात बेस्टच्या ताफ्यात ३२०० बसगाड्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या बसगाड्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती ‘बेस्ट’च्या सूत्रांनी दिली आहे.
बेस्टने भाडेतत्त्वावर आतापर्यंत १६८४ वातानुकूलित बस घेतल्या असून बेस्टचा एकूण ताफा २९७८ इतका झाला असल्याची माहिती बेस्टच्या सूत्रांनी दिली. लोकल सेवेनंतर मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सर्वाधिक भार हा बेस्ट उपक्रमावर आहे. अशात बेस्टच्या मालकीच्या अनेक बसचे आयुर्मान संपल्याने त्या बाद करण्यात येत आहेत. परिणामी रस्त्यावरील बसची संख्या कमी झाली आहे. बेस्ट उपक्रमातील बसेसची संख्या २०२५ पर्यंत १९ हजार ६६२ इतकी वाढवण्यात येणार आहे; मात्र नव्या वर्षात ३२०० बस वाढवण्याचा निर्णय घेण्यात
आला आहे.
भाडेतत्त्वावरील बसचा खर्च कमी :
बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या बसेसचा खर्च प्रतिकिलोमीटर १९३.६४ रुपये इतका असून, भाडेतत्त्वावरील बसेसचा खर्च प्रतिकिलोमीटर १२० रुपये असा असल्यामुळे स्वमालकीपेक्षा भाड्याच्या गाड्यांची संख्या वाढवण्यावर बेस्ट उपक्रमामार्फत भर देण्यात आल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.
२,१०० साध्या बसचा आहे समावेश :
यामध्ये ९०० दुमजली इलेक्ट्रिक तसेच २०० एकमजली सीएनजी उर्वरित २१०० साध्या बसचा समावेश आहे.
सध्या ३५ दुमजली आणि ४५ एकमजली अशा एकूण ८० बसगाड्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात आहेत.