२४ तास वेगवेगळ्या ठिकाणी सेवा सुरु
मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने २४ मार्चपासून एक्सप्रेस, उपनगरीय लोकल बंद केल्या आहेत. लॉकडाऊन काळात फक्त २४ तास मालगाडीची वाहतूक सेवा सुरु आहे. मध्य रेल्वे मार्गावरून मालगाडीद्वारे जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली जात आहे. १५ दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे ३८ हजार वॅगन्समधून वाहतूक केली आहे.
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी रेल्वे मंडळाने भारतीय रेल्वे सेवा बंद केली. त्याचपाठोपाठ 22 मार्च पासून आंतरराष्ट्रीय विमाने रद्द केली आहे. त्यानंतर 24 मार्चला मध्यरात्रीपासून देशांतर्गत विमाने रद्द करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात लहान पार्सल आकारातील वैद्यकीय साहित्य, वैद्यकीय उपकरणे, अन्न इत्यादीसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक बंद पडू नये, यासाठी मध्य रेल्वेनी पार्सल वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे अशा पाच विभागातून वेगवेगळ्या ठिकाणी २३ मार्चपासून ते ७ एप्रिलपर्यंत या वॅगन्स लोड केल्या गेल्या. या कालावधीत कोळसा, इंधन, खत, साखर, स्टील यासारख्या वस्तूची वाहतूक केली. १५ दिवसाच्या कालावधीत ३७ हजार ७८५ वॅगन्सची वाहतूक करण्यात आली.
रेल्वे कर्मचाऱ्यांनी मालवाहतूक धक्के (गुड्स शेड), स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांमधून देशभरात जीवनावश्यक वस्तूची वाहतूक केली जात आहे. वरिष्ठ स्तरावर अधिका-यांमार्फत मालवाहतूकीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. मध्य रेल्वेला या कठीण काळात आपली महत्त्वपूर्ण भूमिकेची जाणीव आहे, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
------------------------------------
सामग्री वॅगन्स
कोळसा २२ हजार ४३४
कंटेनर ११ हजार ९९
पेट्रोलियम उत्पादने २ हजार ४६५
विविध वस्तू ८१५
खते ३९२
स्टील १६९
साखर १६८
डी-ऑईल केक १२६
सिमेंट ११७
------------------------------------
एकूण ३७, ७८५