मुंबई : लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक आयोगाकडून मतदान पूर्व आणि मतदान दिवसाचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्याच्या पहिल्याच दिवसापासून आपले प्रशिक्षण आणि ड्यूटी रद्द करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या अर्जाचा पाऊस सुरू आहे. कोणाची बायको, तर कोणाची आई आजारी आहे, अशी अनेक कारणे सांगत निवडणूक ड्यूटी रद्द करण्यासाठी अर्ज सुरू आहेत.
चार हजार कर्मचाऱ्यांनी केला अर्ज-
मुंबई उपनगर जिल्ह्यात तीन हजार आणि मुंबई शहर जिल्ह्यात दीड हजार असे मिळून जवळपास चार हजार कर्मचाऱ्यांनी आपले प्रशिक्षण आणि ड्यूटी रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठी खास तीन कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. तेथे दिवसाला १५० ते १८० अर्ज येत आहेत.
अर्जामध्ये नमूद केलेली काय आहेत कारणे?
आईचे, बायकोचे आजारपण : आई, वडील किंवा बायको आजारी असते किंवा कुटुंबातील अन्य कोणी आजारी असल्याने त्याचे ऑपरेशन, देखभाल अशा कारणांसाठी ड्यूटी रद्द करण्याची मागणी होत आहे.
घरात दुःखद घटना : राहत्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्याने प्रशिक्षण ड्युटी रद्द करावी अशी मागणी केली जाते.
दिव्यांग असल्याने काम जमणार नाही : मोठ्या प्रमाणात अर्ज हे दिव्यांग कर्मचाऱ्यांनी केले आहेत. विशिष्ट दिव्यांग असल्याने निवडणुकीत मोठी ड्युटी जमणार नाही असे विनंती अर्ज आले आहेत.
विवाह : निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच अनेकांनी आपल्या मुलांचे, भावा-बहिणीचे किंवा स्वतःच्या लग्नाचे मुहूर्त धरले आहेत. मुंबईतील मतदानाचा काळ उन्हाळी सुटीचा असल्याने अनेकांनी गावी लग्न कार्य ठेवली आहेत.
इलेक्शन ड्युटीची ऑर्डर रद्द करण्यासाठी कार्यालयात अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, कोणाचीही विनंती मान्य करून प्रशिक्षण किंवा ड्युटी रद्द केलेली नाही. ज्याचा विनंती अर्ज खरंच विचार करण्यासारखा असेल, त्याचाच विचार केला जाईल.- सतीश बागल, उपनगर निवासी, उपजिल्हाधिकारी, मुंबई