Join us

४,१२८ दुचाकी चालकांना जीवाची नाही पर्वा; विनाहेल्मेट दुचाकी चालकांचं प्रमाण वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 9:42 AM

२४ तासांत वाहतूक विभागाच्या पोलिसांनी केल्या कारवाया. 

मुंबई : रस्ते वाहतुकीचे नियम कठोर करूनही आणि विनाहेल्मेट दुचाकी चालवणारांचे अपघाती मृत्युचे प्रमाण अधिक असूनही नियमभंग करण्याच्या प्रमाणात घट झालेली नसल्याचे रविवारी राबविलेल्या एका मोहिमेत स्पष्ट झाले. वाहतूक पोलिसांनी २४ तासात चार हजार १२८ दुचाकीस्वारांना विनाहेल्मेट गाडी चालवताना पकडले. रस्ते अपघातात ६० ते ६५ टक्के अपघात हे दुचाकीस्वारांशी संबंधित असतात असे आकडेवारी सांगते. तरीही मुंबईत याबाबत बेफिकिर वृत्ती दिसून येते असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.

अलीकडे पोलिसांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याविरोधातील  कारवाईचा वेग वाढला आहे. त्यात सर्वाधिक प्रमाण विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांचे आहे. या कारवाईदरम्यान दर दिवशी दोन ते तीन हजार वाहनचालकांवर कारवाई सुरू आहे. रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असूनही हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांविरोधातील कारवाईचा आकडा ४ हजारांच्या पुढे गेला आहे.  वाहतूक शिस्तीचा एक भाग म्हणून मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने बेवारस वाहने हटविण्याची मोहीम राबवली. 

रस्त्याच्या कडेला तसेच नो-पार्किंगमध्ये उभे असलेल्या वाहनांना टोइंग करून विविध वाहतूक चौक्यांबाहेर ठेवण्यात आले आहे. यापैकी ३९०१ वाहने त्याचे मालक न फिरकल्याने वाहतूक पोलिस चौक्यांबाहेर धूळखात पडली आहेत. १५ फेब्रुवारीपर्यंत याचे मूळ मालक कागदपत्रांसह न आल्यास ही वाहने लिलावात काढण्यात येणार असल्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती.

विशेष मोहिम :

एका विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांच्या अभिलेखावर असलेल्या दोन हजार ७२० गुन्हेगारांपैकी ५०७ जणांचा शोध घेतला गेला. यापैकी ११२ जण कारवाईत सापडले. त्यासोबतच अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या ३४ जणांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी २४ तासात चार हजार १२८ दुचाकीस्वारांना विनाहेल्मेट गाडी चालवताना पकडले.

वाहन चालक गोंधळात पडतात : 

  फास्ट डिलिव्हरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या काही ऑनलाईन सेवांचे दुचाकीस्वार वाहतुकींच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. 

  हे दुचाकीस्वार सिग्नल मिळाला नसतानाही आपले वाहन दामटतात. अनेकदा समोरच्या बाजूने येणारे वाहनचालक त्यामुळे गोंधळात पडतात. नियमांचे उल्लंघन करणारांमध्ये मोठे प्रमाण या जलद सेवा देणाऱ्या काही ऑनलाईन सेवा देणारांचे आहे. 

  या विरोधात पोलिसांनी त्या त्या सेवा पुरवठादार कंपन्यांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जाते. 

टॅग्स :मुंबईवाहतूक पोलीस