मुंबई : मुंबईतीलमहिला पुरुषांच्या तोडीस तोड काम करतात. नोकरदार महिलांपासून, मनोरंजनापासून ते बिझनेस क्षेत्रातही महिलांचे वर्चस्व आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिलाही आपला मतदानाचा अधिकार बजावतात. येथील महिलांची मते जिंकण्या-हरण्यासाठी निर्णायक ठरतात. त्यामुळेच येथे महिलांचे मुद्देही विचारात घ्यावे लागतात.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईच्या सहा मतदारसंघांतून यंदा एकट्या मुंबईत ४५ लाखांच्या आसपास महिला मतदार आहेत. खासदारकीसाठी दोन महिलांच्या नावाची चर्चा आहे.
२०१९ मध्ये मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव करून पूनम महाजन खासदार झाल्या. यंदा २० मे रोजी मुंबईत मतदान होणार असूनही अद्याप उमेदवारांच्या नावाबाबत अद्याप स्पष्टता नाही. मुंबई उपनगरात ३४ लाख १७ हजार ३५१ महिला मतदार आहेत.
१६ एप्रिलपर्यंत मुंबईत शहर व उपनगर मिळून ४५ लाख ५३ हजार ७५३ महिला मतदार असून मुंबईत मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी २३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिल्याने या आकडेवारीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
अनेक प्रलोभने, तरीही निर्णयांवर ठाम -
महिला आपल्या अधिकाराप्रति अधिक सजग असून कोणाच्या दबावाखाली न येता मतदान करतात. त्यांची मते मिळविण्यासाठी राजकीय पक्ष अनेक प्रलोभने देतात.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महिलांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला मत दिल्याने भाजप सत्तेवर आली. त्यामुळेच भाजपने महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्याकरिता अनेक योजना सुरू केल्या. आता काॅंग्रेसनेही महिला न्याय गॅरंटीसह पाच मोठ्या योजना महिलांसाठी जाहीर केल्या आहेत.