मुंबई : आर्थिक गुन्हे शाखेने एका दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. रईसाखान पुनावाला व तिचा पती मुस्तफा बेग असे या दाम्पत्याचे नाव असून त्यांनी आतापर्यंत सुमारे साडे चारशे गुंतवणूकदारांची २० कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने बिल्किस अफरोज शेख(४८) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. तक्रारीनुसार, पूनावाला आणि बेग हे आर के इंटिरियर नावाची कंपनी सांताक्रुझ पश्चिम येथे चालवत होते. त्यांनी गुंतवणूकदारांना त्यांच्या कंपनीत पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. त्यासाठी ९० ते १०० दिवसात गुंतवलेल्या रकमेच्या दीडपट पैसे देण्याचे आमीष दाखवले. तक्रारदार शेख (४८) या बुटीक चालवतात. पुनावाला ही त्यांची छोटी बहिणी असल्यामुळे त्यांनी विश्वास ठेवून सुमारे १८ लाख रुपये गुंतवले. शेखने तिच्या मैत्रिणी आणि नातेवाईक मंडळातील इतर लोकांनाही तिच्या बहिणीच्या कंपनीत पैसे गुंतवून नफा कमावण्यास सांगितले. बहुतेक गुंतवणूकदार हे मध्यमवर्गीय कुटुंबातील आणि छोटे व्यावसायिक आहेत. एका गुंतवणूकदाराने आठ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. शेखच्या बोलण्यावर विश्वास ठेवत शेकडो लोकांनी शेख यांच्यामार्फत पूनावालाकडे पैसे गुंतवले. बहुतांश गुंतवणूक रोख स्वरूपात होती.
गुंतवणूकीचा कालावधी संपल्यानंतर पूनावालाने व्याज व मुद्दल तक्रारदारांना दिली नाही. याबाबत तेव्हा गुंतवणूकदारांनी शेख यांना विचारण्यास सुरुवात केली. शेखने धाकटी बहीण पूनावाला यांच्याकडे पैशांची मागणी केल्यानंतर तिने तिला एकूण सहा कोटी २१ लाख रुपयांचे धनादेश दिले. त्यानंतर पुनावाने शेख व त्यांच्यापतीचे धनादेश घेऊन तक्रारादारांना शेख यांची स्वाक्षरी करून दिले. त्यावेळी अनेकांनी धनादेश बँकेत जमा केले. पण खात्यात रक्कम नसल्यामुळे ते वठले नाही. त्यावेळी गुंतवणूकदारांनी शेख यांच्याविरोधात धनादेश न वठल्याप्रकरणी खटला नोंदवला.
अखेर, शेख यांनी न्यायालयात धाव घेताच, न्यायालयाच्या आदेशानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी पूनावाला आणि त्यांचे पती बेग यांच्यावर गुन्हा दाखल केला ahem पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.