पाच फूट पाण्यात रात्रभर अडकल्या सुमारे ३०० म्हशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 03:23 AM2019-08-07T03:23:30+5:302019-08-07T03:23:33+5:30
मुंबईसह पश्चिम उपनगरांत गेल्या शुक्रवारी व शनिवारी दोन दिवसांपासून कोसळलेल्या मुसळधार पावसांचा फटका जनावरांना बसला आहे.
मुंबई : मुंबईसह पश्चिम उपनगरांत गेल्या शुक्रवारी व शनिवारी दोन दिवसांपासून कोसळलेल्या मुसळधार पावसांचा फटका जनावरांना बसला आहे. प्रभाग २६ लक्ष्मीनगर, बारक्या रामा कंपाउंड येथे ५ फूट पाण्यात सुमारे २५० ते ३०० म्हशी येथील तबेल्यात अडकल्या होत्या. गेल्या शुक्रवारची रात्र त्यांनी येथील तुंबलेल्या पाण्यात घालविली होती. या घटनेची माहिती मागाठाणे येथील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पालिकेच्या आर दक्षिण विभागाला येथील पाण्याचा निचरा करण्याचे आदेश दिले. प्रशासनाने ठोस पावले उचलत येथील पाण्याचा निचरा वेळीच केल्याने येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली नाही, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली. पावसात अडकलेल्या मागाठाणे येथील नागरिकांना जर कोणतीही मदत लागल्यास, त्यांना मदतीचा हात पुढे करत प्रकाश सुर्वे यांनी सुमारे दीड लाख एसएमएस आणि व्हॉट्सअप पाठविले.
येथील खडी मशिनमधून येणारे पावसाचे पाणी नाल्यात जाते. त्यातच येथील नाला अरुंद केल्याने तो तुडुंब भरून वाहू लागतो. त्यामुळे लगतच्या लक्ष्मीनगर आणि या बारक्या रामा कंपाउंडमधील तब्येलात पाणी शिरते. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत होते.
गेल्या वर्षी अशाच प्रकारे लक्ष्मीनगरांतील घरांमध्ये पाणी शिरले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सदर नाला लवकर रुंद करण्याचे आश्वासन सुर्वे यांनी येथील नागरिकांना दिले आहे.