Join us

कामात हयगय केल्यास भरावे लागतील ५ लाख; अतिरिक्त आयुक्तांकडून दंडाचे फर्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 10:05 AM

मुंबईतील प्रसाधनगृहाची गैरसोय दूर करण्यासाठी महापालिका लॉट-१२ अंतर्गत १४ हजार शौचालये बांधणार आहे.

मुंबई : मुंबईतील प्रसाधनगृहाची गैरसोय दूर करण्यासाठी महापालिका लॉट-१२ अंतर्गत १४ हजार शौचालये बांधणार आहे. याला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. तसेच म्हाडाच्या प्रसाधनगृहाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पालिकेवर आहे. पालिकेने लॉट-१२ अंतर्गत सामुदायिक शौचालये बांधण्याच्या कामाचा आढावा शनिवारी पश्चिम उपनगरांचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी घेतला. या आढाव्यादरम्यान त्यांनी पश्चिम उपनगरातील कंत्राटदारांच्या कामाच्या प्रगतीबाबत असमाधान व्यक्त केले असून,  याशिवाय या कंत्राटदारांच्या कामाचे शौचालयांच्या  बांधकामाच्या प्रगतीनिहाय आढावा घेऊन आणि त्यांचे मूल्यमापन करून ५ लाखांपर्यंत दंड आकारण्याचे आदेश त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुंबईतील ६० टक्के जनता झोपडपट्टीत राहते. झोपडपट्टीतील रहिवाशांना सार्वजनिक शौचालयांशिवाय पर्याय नसतो. मात्र, बहुतांश ठिकाणी या शौचालयांची दुरवस्था झाली आहे. गेल्यावर्षी पालिकेने लॉट ११ या उपक्रमांतर्गत २२ हजार शौचकूप बांधण्याचा संकल्प सोडला होता. त्यापैकी ९० टक्के शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. आता लॉट १२ अंतर्गत आणखी शौचालये बांधण्यात येणार आहेत. 

म्हाडाचीही शौचालये ताब्यात घेऊन त्यांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. एकमजली शौचालयांची पुनर्बांधणी करून त्याजागी दुमजली शौचालये बांधण्यात येणार आहेत. काही ठिकाणी नव्याने शौचालय बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी लॉट-१२ अंतर्गत पहिल्या टप्प्यात ५५९ शौचालये बांधण्यात येणार असून, मुंबईत एकूण १४ हजार १६६ नवीन शौचकुपांचे बांधकाम केले जाणार आहे. या कामासाठी ऑगस्ट महिन्यात कार्यादेश देण्यात आले होते व सल्लागारही नेमले आहेत. 

कोणत्या भागामध्ये किती कामे?

शहर विभागामध्ये सल्लागारांनी १८ नकाशे मंजुरीसाठी सादर केले असून, त्यापैकी १८ नकाशांची छाननी झाली आहे, तर ८ शौचालयांचे आराखडे मंजूर केलेले आहेत. एकूण २० ठिकाणी प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली आहे.

पूर्व उपनगर विभागामध्ये ९४ नकाशे मंजुरीसाठी सादर केले असून, त्यापैकी ४० नकाशांची छाननी झाली आहे, तर ३० शौचालयांचे आराखडे मंजूर केलेले आहेत. एकूण ४० ठिकाणी प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली आहे.

पश्चिम उपनगर विभागामध्ये सल्लागारांनी ९५ नकाशे मंजुरीसाठी सादर केले असून, त्यापैकी ४९ नकाशांची छाननी झाली आहे, तर ३४ शौचालयांचे आराखडे मंजूर केलेले आहेत.  एकूण १७ ठिकाणी प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली आहे.

 

टॅग्स :मुंबईनगर पालिका