Join us

रमाबाई आंबेडकर नगरच्या पुनर्विकासासाठी ५०० कोटी; रहिवाशांना तात्पुरत्या स्थलांतरणासाठी एसआरए देणार भाडे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 10:24 AM

पुनर्विकासाचे काम पूर्ण होईपर्यंत रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात भाड्याच्या घरात स्थलांतरासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम देण्याचा निर्णय एसआरएने घेतला आहे. 

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी ५०० कोटी रुपये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) दिले जाणार आहेत. पुनर्विकासाचे काम पूर्ण होईपर्यंत रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात भाड्याच्या घरात स्थलांतरासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम देण्याचा निर्णय एसआरएने घेतला आहे. 

३३.१५ हेक्टर जागेचा विकास करून तेथील अंदाजे १६ हजार ५७५ झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमएमआरडीए आणि एसआरए यांच्या माध्यमातून हे पुनर्वसन केले जाणार आहे. या करारामुळे आता पूर्व द्रुतगती महामार्ग विस्तारासाठी लागणारी जमीन एमएमआरडीएला विनामूल्य मिळणार आहे. तसेच या भागातील सुमारे २ हजार रहिवाशांचेही पुनर्वसन केले जाणार आहे. एमएमआरडीएला अतिरिक्त ५ हजार घरे उपलब्ध होणार आहेत. पुनर्विकास होणाऱ्या इमारतींचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतरण करावे लागणार आहे. 

१) भाड्यापोटी मोठी रक्कम एमएमआरडीएला खर्च करावी लागणार आहे. एमएमआरडीएने या खर्चापोटी ५०० कोटी रुपयांची मागणी एसआरएकडे केली होती. 

२) आता एसआरएने ही रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

असे असेल कामाचे नियोजन-

एमएमआरडीए आणि एसआरए यांच्यामध्ये या पुनर्वसन प्रकल्पासाठी नुकताच करार करण्यात आला आहे. त्यानुसार एसआरएच्या माध्यमातून या भागातील बाधित झोपड्यांचे सर्वेक्षण, रहिवाशांची पात्रता निश्चिती, जागा मोकळी करून देणे आणि पात्र रहिवाशांना घराचा ताबा देण्याचे काम केले जाणार आहे, तर एमएमआरडीएवर पुनर्विकास केल्या जाणाऱ्या बांधकामाची जबाबदारी असणार आहे.

टॅग्स :मुंबईघाटकोपरएमएमआरडीए