Join us

सुट्टीत फिरायला गेले अन् घर साफ झाले! ५ महिन्यांत मुंबईत घरफोडीचे ५३१  गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 11:39 AM

सुट्टीनिमित्ताने घराबाहेर पडलेल्या अनेकांच्या घरात चोरांनी डल्ला मारला आहे.

मुंबई : सुट्टीनिमित्ताने घराबाहेर पडलेल्या अनेकांच्या घरात चोरांनी डल्ला मारला आहे. गेल्या पाच महिन्यांत मुंबईत घरफोडीचे ५३१  गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी ४२२ गुन्हे रात्रीच्या वेळी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, या वर्षी जानेवारी ते मे या पाच महिन्यांत मुंबईत घडलेल्या ५३१ पैकी ३१२ घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. सुट्टीच्या काळात अर्थात मे महिन्यात १०६ घरफोडीचे गुन्हे झाले असून, २०२० मध्ये लॉकडाऊनच्या सुरुवातीला एप्रिल आणि मे महिन्यात शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. मात्र, सर्वत्र अनलॉक होताच गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले. घरफोडीसह चोरी, वाहन चोरल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. 

चौकाचौकांत पोलिसांचा ‘वॉच’-

१) हत्या, हत्येचा प्रयत्न अशा घटनांमध्ये वाढ होत असून, पोलिसांकडून गस्त वाढवून नागरिकांमध्ये जास्तीतजास्त जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. 

२) तसेच साध्या वेशातही चौकाचौकांत वॉच ठेवून पोलिसांकडून आरोपीची धरपकड सुरू आहे.

सोशल मीडियावरील पोस्ट चोराला निमंत्रण-

१) सुट्टीनिमित्ताने बाहेर गेल्यानंतर अनेक जण लाइक, शेअरिंगच्या नादात सोशल मीडियावर प्रत्येक ठिकाणाचे फोटो आणि अपडेट लोकेशनसहित शेअर  करताना दिसत आहे. 

२) त्याचाही सायबर भामट्यांसह अशा चोरट्यांना फायदा होताना दिसत आहे. त्यामुळे यावरही कुठे तरी नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिसचोरी