मुंबई : आयटी, कम्प्युटर सायन्स यांसारख्या निवडक विषयांना प्रवेश मिळावा, यासाठी जीवाचे रान करणाऱ्या विद्यार्थ्यांची या ताणतणावातून सुटका करण्याकरिता मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (आयआयटी) पहिल्या वर्षानंतर शाखा बदलाचा पर्याय रद्द केला. मात्र, पहिल्या वर्षाच्या सुमारे ५९ टक्के विद्यार्थ्यांनी संधी दिल्यास आपली शाखा बदलण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
‘आयआयटी’च्या ‘इनसाइट’ याअंतर्गत पब्लिकेशनसाठी ही पाहणी करण्यात आली आहे. यात संबंधित निर्णयाबाबत विद्यार्थ्यांचे विचार जाणून घेण्यात आले. पहिल्या वर्षाच्या २०० विद्यार्थ्यांची पाहणी याकरिता करण्यात आली.
‘आयआयटी’च्या ‘अकॅडमिक स्ट्रेस मिटिगेशन कमिटी’च्या शिफारसीवरून शाखा बदलाचा पर्याय गेल्यावर्षी बंद करण्यात करण्यात आला. त्याआधी पहिल्या वर्षानंतर शाखा बदलासाठी पात्र ठरविले जात असे.
मात्र, त्याकरिता जास्तीत जास्त मार्क मिळविण्यासाठी विद्यार्थी धडपडत असत. दर्शन सोळंकी या आयआयटीयन्सच्या मृत्यूनंतर समितीच्या शिफारसीवरून विद्यार्थ्यांमधील ताण दूर करण्याकरिता ‘आयआयटी’ने हा पर्याय बंद केला.
उच्चशिक्षणाच्या संधीसाठी इच्छा-
१) शाखा बदलाचा पर्याय काढून टाकला तरीही १८८ आयआयटीयन्सना प्लेसमेंट, पिअर प्रेशर, भविष्यातील उच्चशिक्षणाच्या संधी या कारणांमुळे चांगले गुण मिळवावेसे वाटतात.
२) चांगल्या प्लेसमेंटसाठी मुंबई-आयआयटीची निवड केल्याचे मत ११४ विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
३) ५८ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आणखी चांगल्या व दर्जेदार विद्यापीठात प्रवेश घ्यायचा आहे.
४) ५९ टक्के विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाखा बदलण्याची इच्छा व्यक्त केली.
काही ठराविक शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल असतो; मात्र १०० विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो. शाखा बदलाचा निर्णय रद्द करण्यापूर्वी त्याबाबत विविध स्तरांवर चर्चा झाली होती; याची माहिती करून दिली होती. त्यानंतर सिनेटची मान्यता घेण्यात आली.
पाहणीचा उद्देश-
१) विशिष्ट शाखांच्या विद्यार्थ्यांच्या निवडीमागील प्रेरणा काय असतात, त्याबाबत ते समाधानी आहेत का?
२) चांगले गुण मिळविण्याचे प्रेरणास्त्रोत काय?