मुंबई : घर खरेदीदार, बँका व गुंतवणूकदारांना तब्बल ४०८ कोटी २५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या कमला लँडमार्क ग्रुप ऑफ कंपनीच्या संचालकांची एकूण ६३ कोटी ९६ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने (सक्तवसुली संचालनालय) गुरुवारी जप्त केली. जप्तीमध्ये कंपनीचे संचालक जितेंद्र जैन यांची ४८ कोटी ६७ लाख रुपयांची मालमत्ता तर त्याचसोबत कमला लँडमार्क कंपनीत भागीदार असलेल्या पार्थव शेट्टी यांची देखील १५ कोटी २९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये जितेंद्र जैन व कुटुंबीयांचे ३३ कोटी रुपयांचे मुंबई शहरातील फ्लॅट, राज्यात विविध ठिकाणी असलेले १५ , कोटी रुपयांचे भूखंड, ६० लाखांचा आणखी एक भूखंड तसेच पार्थव शेट्टी व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेले १५ कोटी २९ लाख रुपये मूल्याचे मुंबई शहरातील फ्लॅट आदींचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, जैन यांनी गृहनिर्माण प्रकल्पाच्या बांधणीसाठी बँकांकडून मोठ्या प्रमाणावर कर्जाची उचल केली होती. या कर्जापैकी ११० कोटी ९० लाख रुपये थकीत कर्ज म्हणून घोषित केले. तर, गृहनिर्माण प्रकल्पात घर खरेदीदारांकडून व गुंतवणूकदारांकडून देखील एकूण २९७.३५ कोटी रुपये आगाऊ स्वीकारले होते.
मात्र, या घर खरेदीदारांना संबंधित विकासकाने घर दिले नाही. ही सर्व रक्कम त्यांनी आपल्या समूहातील अन्य कंपन्यांत वळवून तेथून लंपास केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्यावर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एकूण ३७ गुन्हे दाखल केले आहेत. तर या खेरीज मुंबईतील अन्य पोलिस ठाण्यांमध्ये देखील त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ‘ईडी’ने आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.