पालिकेच्या तावडीतून ६८ बिल्डर सुटले; ८०० बांधकामांची मुजोरी कायम 

By जयंत होवाळ | Published: January 4, 2024 09:44 AM2024-01-04T09:44:41+5:302024-01-04T09:45:40+5:30

पालिकेच्या दट्ट्यानंतर बांधकाम क्षेत्र वळणावर. 

About 68 builders were released from the clutches of the municipality the 800 construction projects continued in mumbai | पालिकेच्या तावडीतून ६८ बिल्डर सुटले; ८०० बांधकामांची मुजोरी कायम 

पालिकेच्या तावडीतून ६८ बिल्डर सुटले; ८०० बांधकामांची मुजोरी कायम 

जयंत होवाळ,मुंबई : प्रदूषण प्रतिबंधक नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे २०२३ बांधकामांना महापालिकेने नोटिसा बजावल्या तर ८६८ बांधकामांचे काम थांबविण्यात आले आहे. मात्र ६८ बांधकामांवर घातलेली बंदी उठवली आहे. या बांधकामांनी बंदीनंतर प्रदूषण प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन केल्यामुळे बंदी उठवण्यात आली आहे. बंदी घातल्यानंतर या ठिकाणी नियमांचे पालन करणे सुरू झाले आहे का, उपाय योजण्यात आले आहेत का, याचा आढावा घेऊन बंदी उठवण्याची कार्यवाही केली जात आहे. पालिकेच्या दट्ट्यानंतर बांधकाम क्षेत्र काहीसे वळणावर येऊ लागल्याचे चित्र आहे. 

मुंबईत सध्या  विविध पायाभूत प्रकल्प तसेच इमारतींची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. धूळ आणि प्रदूषणाने उच्चांक गाठल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पालिकेने प्रदूषण होत असलेल्या सर्वच ठिकाणांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. प्रदूषण प्रतिबंधात्मक उपाय योजन्यासाठी १५ दिवस ते एक महिन्याचा अवधीही देण्यात आला होता. त्यानंतर मात्र कारवाईला सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात बांधकामांवर सरसकट बंदी घालण्याऐवजी संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या. नोटिसीवर अमल न झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर मात्र पालिकेने थेट बांधकाम बंदी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बांधकाम क्षेत्राला किंवा प्रकल्प स्थळांना जाग येऊ लागली. 

८०० बांधकामांची मुजोरी कायम :

८६८ बांधकामांपैकी फक्त ६८ बांधकामांवरील बंदी उठली आहे. याचा अर्थ अजूनही ८०० बांधकामांची मुजोरी कायम असल्याचे दिसून आले आहे. बांधकाम बंदीमुळे आर्थिक नुकसान होत आहे, प्रकल्प रखडत आहे, असे असतानाही ही मंडळी पालिकेला जुमानत नाहीत की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सातत्याने आढावा :

नियमांचे पालन होत आहे की   नाही, बंदी असलेल्या ठिकाणी पुन्हा काम सुरू झाले आहे का, याचा विभागस्तरावर आढावा घेतला जातो. ज्या ठिकाणी बंदी आहे, परंतु त्या ठिकाणी नियमांचे पालन करण्यास सुरुवात झाली आहे, त्या ठिकाणचे बांधकामाशी  संबंधित प्रतिनिधी पालिकेला संपर्क साधतात. मग अशा ठिकाणी पुन्हा पाहणी करून खातरजमा केली जाते, त्यानंतर बंदी उठवण्यात येते. - मिनेश पिंपळे, उपायुक्त  (पर्यावरण), पालिका 

  प्रतिबंधात्मक उपाय योजन्यासाठी आतापर्यंत २०२३ बांधकामांना इशारा देणाऱ्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तर ८६८ बांधकामांवर बंदी घालण्यात आली आहे.  नियमांचे पालन होत आहे की  नाही हे तपासण्यासाठी पालिकेने विभागवार ९५ पथके तैनात केली आहेत. 

  या पथकाकडून आढावा घेण्याचे  काम सुरू असते. आढाव्याअंती बंदी घातलेल्या बांधकामांनी नियमांचे पालन केल्याचे आढळून आल्यामुळे बंदी उठवण्यात आली आहे. बंदी असतानाही काम सुरू असल्याचे निदर्शनास  आल्यास पोलिसात गुन्हा दाखल केला जात आहे. 

Web Title: About 68 builders were released from the clutches of the municipality the 800 construction projects continued in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.