Join us

मुंबईत ७ लाख घरे बंद? सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह, ३ लाख ८३ हजार जणांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 10:49 AM

३ लाख ८३ हजार जणांचा सर्वेक्षणाला नकार.

मुंबई : मुंबईतील ७ लाख १८ हजार घरे बंद असून जवळपास ३ लाख ८३ हजार नागरिकांनी सर्वेक्षणाला नकार दिल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. यामुळे पालिकेकडून ८ दिवसांत एकूण २५ लाख ९८ हजार ६२१ घरांचे सर्वेक्षण माहिती घेऊन पूर्ण झाले आहे. पालिका कर्मचाऱ्यांकडून ८ दिवसांत तब्बल ३७ लाख घरांमध्ये जाऊन विचारणा करण्यात आली. मात्र अनेक ठिकाणी हे सर्वेक्षण पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे आतापर्यंत ९५ टक्के घरांची सर्वेक्षणासाठी तपासणी झाली असली तरी ७० टक्के घरांचेच सर्वेक्षण पूर्ण होऊ शकले आहे.

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. मुंबईत २३ जानेवारीपासून सुरू झालेल्या या सर्वेक्षणाची जबाबदारी मुंबई महापालिकेकडे आहे. मात्र पालिका कर्मचाऱ्यांना अनेक ठिकाणी सकारात्मक प्रतिसादासह नकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही समोर आले आहे. यात मराठा आरक्षणात सरसकट सर्व धर्मांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यामुळे अन्य धर्मीयांकडून माहिती देण्यास नकार देण्याचे प्रमाणही अधिकच आहे. तसेच काही वेळा या कामाचे परिपत्रक मागणे, मोठ्या प्रमाणात प्रश्नावली पाहता पुढील उत्तरे देण्यास टाळाटाळ केली जात आहेत.

टॅग्स :नगर पालिकामराठा आरक्षण