मुंबई : मुंबई महानगरपालिकेने आरोग्य सुविधांवर वर्षभरामध्ये सुमारे ७ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये झिरो प्रिस्क्रीप्शन धोरण राबविण्यासाठी सुमारे २ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याद्वारे रुग्णांना नि:शुल्क औषधी उपलब्ध करून दिली जातील. आरोग्य सुविधेसाठी इतका मोठा निधी खर्च करणारी महानगरपालिका ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे, असे प्रतिपादन शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
शिंदे हे नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या विस्तारित नवीन इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी बोलत होते. त्यावेळी शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार यामिनी यशवंत जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाची ही विस्तारित नवीन इमारत एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या तोडीची आहे. येथील आरोग्यविषयक सुविधाही तितक्याच अत्याधुनिक व अद्ययावत आहेत. वैद्यकीय शिक्षण व विद्यार्थ्यांचा सार्वभौम विचार करून वसतिगृहासह अन्य सुविधांचा या इमारतीमध्ये समावेश करणे गौरवास्पद आहे. महानगरपालिकेच्या वतीने पायाभूत सुविधांच्या बाबतीत खूप कामे सुरू आहेत. उत्तम आरोग्य सुविधेसाठी ७ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.
दंत महाविद्यालयात कोणत्या सुविधा ?
१) मुंबई सेंट्रलस्थित नायर रुग्णालय दंत महाविद्यालयात नियमितपणे सुमारे ८०० ते १००० रुग्ण उपचारांसाठी येतात. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महानगरपालिकेच्या वतीने रुग्णालयाची ११ मजली विस्तारित इमारत बांधण्यात आली आहे. पहिले सहा मजले हे रुग्ण सुविधेसाठी असून उर्वरित पाच मजले विद्यार्थी वसतिगृहासाठी आहेत.
२) या इमारतीमध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, फॅन्टम आणि सिम्युलेटर प्रयोगशाळा, प्री क्लिनिकल प्रयोगशाळा यांच्यासह विविध सुविधा अद्ययावत केल्या आहेत. अत्यंत माफक दरामध्ये रुग्णांना लाभ घेता येईल.