मुंबईतील ७२ हजार तरुण प्रथमच करणार मतदान; उपनगरात नवमतदारांमध्ये तिपटीने वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 09:56 AM2024-03-16T09:56:00+5:302024-03-16T09:57:06+5:30
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होणार आहे.
श्रीकांत जाधव, मुंबई :लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वत्र निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या निवडणुकीत आपल्याला मतदानाचा हक्क बजावायला मिळावा, यासाठी हजारो तरुणांनी नोंदणीकरिता अर्ज केले होते. त्यापैकी जवळपास ७२ हजार तरुण-तरुणींचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. त्यामुळे ते यंदा पहिल्यांदाच आपल्या पसंतीच्या उमेदवारास बहुमूल्य मत देऊ शकणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वयोगटानुसार १८ ते १९ वयोगांतील तरुण-तरुणींना नवे मतदार म्हणून संबोधले गेले आहे.
मुंबईतील तरुण मतदार -
मुंबई शहर जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटांतील १७,४४० नव मतदार आहेत. तर, २० ते २९ वर्ष वयोगटांत १,६१,४४३ पुरुष आणि १,२९,५२० महिला मतदार आहेत.
जिल्हानिहाय नवीन मतदार किती?
१) मुंबई उपनगरातील विविध मतदार नोंदणी कार्यालयांत स्थानिक युवक-युवतींनी अर्ज केले होते.
२) आधी जवळपास १९ हजार ४२३ नव मतदार होते. त्यात वाढ होऊन आज घडीला ५५ हजार नव मतदार झाले आहेत.
३) मुंबई शहर जिल्ह्यातही विविध मतदार नोंदणी कार्यालयांत युवक-युवतींनी अर्ज केले होते.
४) तेथे आधी जवळपास आठ हजार २४० नव मतदार होते. मार्चमध्ये त्यांची संख्या वाढून १७ हजार ४४० अशी आहे.
मलबार हिलमध्ये सर्वांत कमी मतदार -
गेल्या वर्षभरापासून नवमतदार नोंदणीसाठी सरकार आणि राजकीय पक्षांकडून नोंदणीसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, लोकसभानिवडणूक जवळ आली तरी अद्याप लाखो नव मतदारांनी नोंदणीसाठी अर्ज केलेले नाहीत. अर्ज करून नोंदणी झालेल्या शिवडी मतदारसंघात दोन हजार २६० सर्वाधिक मतदार असून सर्वांत कमी मतदार मलबार हिलमध्ये एक हजार ३५४ असे आहेत.
ट्रान्सजेंडर मतदार किती?
मुंबई शहर जिल्ह्यात ७० आणि मुंबई उपनगरात ८२०, असे मिळून ८८० ट्रान्सजेंडर नव मतदारांनी नोंदणी केली आहे.
मतदारांमध्ये मोठी वाढ!
अंतिम मतदार यादीत २६,६२९ मतदारांची निव्वळ वाढ होऊन उपनगरात एकूण मतदारांची संख्या ७२ लाख १७ हजार ३०८ इतकी झाली आहे. पुनरीक्षण कार्यक्रमामुळे १८ ते १९ वर्षे वयोगटातील ७२ हजार ४४० मतदारांची नव्याने भर पडली आहे, तसेच २० ते २९ या वयोगटातील मतदारांची वाढही अधिक आहे.