१५ वर्षे मेट्रो राहणार चकाचक, ७३४.१६ कोटींची तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 10:02 AM2024-02-01T10:02:52+5:302024-02-01T10:06:45+5:30
प्राधिकरणाने मेट्रो ६ साठी काढल्या निविदा.
मुंबई : प्राधिकरणाने मेट्रो ६ साठी निविदा काढल्या आहेत. स्वामी समर्थनगर ते विक्रोळी या मेट्रो ६ मार्गाला वीजपुरवठा, ट्रॅक्शनची कामे, विद्युत आणि यांत्रिकी, लिफ्ट व सरकता जिना रचना, निर्मिती, पुरवठा, स्थापना, एकत्रीकरण, चाचणी व कार्यान्वित करण्यासहित २ वर्षांच्या देखभाल कालावधीतनंतर १५ वर्षे सर्वसमावेशक देखभालीसाठी ७३४.१६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने मुंबई महानगर प्रदेशात राबविण्यात येणारे मेट्रो प्रकल्प वेगाने पूर्ण व्हावेत आणि त्यानंतर त्याची देखभाल-दुरुस्तीही व्यवस्थित व्हावी, यासाठी प्राधिकरणाने वेगाने काम सुरू केले आहे.
मेट्रो लाइन ६ हा उन्नत मार्ग आहे.
मेट्रो लाइन ६ या मार्गाची लांबी १५.३१ किमी आहे.
मार्गावरील ७३.२५ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.
स्वामी समर्थनगर ते विक्रोळीदरम्यानचा हा मार्ग आहे.
मार्गावर १३ स्थानके आहेत.
कुठून कुठे?
जोगेश्वरी, पश्चिम द्रुतगती मार्ग आणि पवईमधून जाणार
कुठे जोडते?
मुंबई मेट्रो लाइन ६ इतर मेट्रो लाइन २ अ, ३, ४ आणि ७ ला जोडते. त्यात १३ स्टेशन आहेत. शिवाय जोगेश्वरी कांजूरमार्ग उपनगरीय रेल्वेला जोडते.