Join us

पालिकेमुळे ७५ हजार जण होणार बेरोजगार; कंत्राट एकाच कंपनीला देण्यास विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 10:25 AM

हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन करू, असा इशारा फेडरेशनने दिला आहे. 

मुंबई : महापालिकेने स्वच्छ मुंबई मोहिमेंतर्गत झोपडपट्ट्यांमधील सफाईचे काम सहकारी संस्थांच्या फेडरेशनकडून काढून एकाच संस्थेला देण्याचा निर्णय घेतल्याने ७५  हजार  जण बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे बृहन्मुंबई बेरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या फेडरेशनने आक्रमक भूमिका घेत विरोध दर्शवला आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन करू, असा इशारा फेडरेशनने दिला आहे. 

बृहन्मुंबई बेरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या फेडरेशनशी बेरोजगार व सेवा संस्था संलग्न आहेत. रोजगार मिळावा यासाठी २००० साली राज्य सरकारने बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्था नोंदणीकृत करण्याचा अध्यादेश काढला. त्यामुळे बेरोजगारांच्या संस्थांना कामे मिळू लागली.   या संस्था गेली २५ वर्षे अत्यावश्यक सेवा कंत्राटी कामगारांमार्फत पुरवत आहेत. झोपडपट्टीत घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छता ठेवणे, सार्वजनिक शौचालयांची  साफसफाई करणे, ड्रेनेज लाईन  साफ करणे आदी कामे हे कामगार करतात. दिवस आणि रात्रपाळीत हे काम चालते.  या कामामुळे त्यांना रोजगार मिळतो. कोरोनाच्या काळातही हे कामगार आपले काम करत होते. कोरोनाचा फटकाही अनेकांना बसला होता.

काँग्रेस आक्रमक :

१) पालिकेच्या निर्णयास पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी विरोध केला असून,  निर्णय रद्द करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. 

२)  सामाजिक संस्थांमार्फत स्वच्छता सेवक नेमून त्यांना काम देण्याचा निर्णय त्यावेळेस पालिकेत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी घेतला होता.

३)  पालिका बरखास्त झाली असताना लोकप्रतिनिधी नसताना निर्णय घेण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला, असा सवाल त्यांनी केला. 

४)  पालिकेचे कंत्राट १२०० कोटी रुपयांचे  आहे. पालिकेच्या निर्णयाने हजारो बेरोजगारांच्या पोटावर पाय येणार  आहे. 

५)  या कामात १०० टक्के मराठी मुले आहेत. नव्या निर्णयामुळे पालिकेचे जास्तीचे पैसे खर्च होणार आहेत, असे त्यांनी  मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पात्रात म्हटले आहे.

पालिकेला पत्र :

या संस्थांच्या कामाबाबत काही तक्रारी पालिकेकडे आल्यानंतर बेरोजगार सहकारी संस्थांकडून काम काढून घेण्यात आले. हे काम आता  एका मोठ्या कंपनीला दिले जाणार आहे. एकाच संस्थेला कंत्राट देण्याची प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी करणारे पत्र फेडरेशनने  अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना दिले आहे, अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष जयंत शिरीषकर यांनी दिली. 

टॅग्स :मुंबईनगर पालिकाबेरोजगारी