मुंबई : परदेशात राहणाऱ्या मित्राचा फोटो व्हॉट्सॲपवर डीपी म्हणून ठेवत एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या ५९ वर्षीय व्यक्तीला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी त्यांनी जुहू पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार बालचंद्र अय्यर (५९, रा. जुहू लेन, अंधरी पश्चिम) यांच्या तक्रारीनुसार त्यांना ८ मे रोजी एका अनोळखी व्हॉट्सॲप क्रमांकावरून ‘हॅलो’ असा मेसेज आला. त्यांनी पडताळले तेव्हा त्यांच्या युएसमध्ये राहणाऱ्या धीरेन मेहता या मित्राचा डीपी त्यावर होता. त्यावेळी त्यांनी काही वेळ गप्पा मारल्या आणि मित्राने त्यांच्याकडे अर्जंट आर्थिक मदत मागितली.
अय्यर यांनी त्याला थोडी-थोडी मदत करत ७.६५ लाख रुपये दिले. त्यानंतर २२ मे रोजी अय्यर यांनी मेहताच्या जुन्या मोबाइलवर फोन करत पैसे कधी देणार याबाबत विचारणा केली. त्यावर मी तुमच्याकडून पैसेच मागितले नाही, असे उत्तर त्यांनी दिले. चौकशीत तो नंबर बोगस असल्याचे उघड झाले आणि याविरोधात त्यांनी जुहू पोलिसात तक्रार दिली.