टिळक पुलावरील ८ बेकायदा होर्डिंग्ज उतरवले; रेल्वेच्या विनंतीनंतर पालिकेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 10:06 AM2024-05-22T10:06:03+5:302024-05-22T10:07:10+5:30
घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर मुंबईतील बेकायदा होर्डिंगची झाडाझडती घेण्यात येत आहे.
मुंबई : घाटकोपरमधील छेडानगर येथे बेकायदा होर्डिंग लावल्या प्रकरणात दोषी आढळलेल्या इगो मीडियाचे दादरच्या टिळक पुलावर आठ बेकायदा होर्डिंग्ज असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते तीन दिवसांत काढण्याची नोटीस मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने रेल्वेला बजावली होती. मात्र, रेल्वे पोलिसांनी यंत्रणेअभावी होर्डिंग्ज हटविण्यात असमर्थता दर्शवित पालिकेला संबंधित होर्डिंग्ज काढण्याची विनंती केली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने रविवारी ते होर्डिंग्ज उतरवले.
घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर मुंबईतील बेकायदा होर्डिंगची झाडाझडती घेण्यात येत आहे. इगो मीडियाने मुंबईत अनेक ठिकाणी बेकायदा होर्डिंग्ज लावले असल्याचे समोर आले. त्यात दादर येथील टिळक पुलावर आठ बेकायदा होर्डिंग्जचा समावेश होता. त्यापैकी एका फलकाची लांबी ८० फूट आणि रुंदी १०० फूट आहे. इतर होर्डिंग ३० बाय ४० फुटांचे आहेत. एक महाकाय १२० फूट बाय १२० फूट आकाराचे होर्डिंग वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्व परिसरात आहे. या सर्व होर्डिंग्जना पालिकेने नोटिसा बजावल्या होत्या.
मुंबईत रेल्वेने आपल्या हद्दीतील एकाही जाहिरात होर्डिंगसाठी पालिकेची परवानगी घेतलेली नाही. तसेच त्यासाठी जाहिरात शुल्कही पालिका प्रशासनाकडे भरलेले नाही. मुंबईत जास्तीतजास्त ४० फूट बाय ४० फूट आकाराच्या होर्डिंगना पालिका प्रशासन परवानगी देत असते. मात्र, रेल्वेच्या हद्दीतील होर्डिंग्ज त्यापेक्षा मोठे आहेत, असे या नोटिशीत स्पष्ट केले होते.
इतर होर्डिंगवर कारवाई कधी?
१,०२५ इतके महाकाय होर्डिंग्ज मुंबईत असून, त्यापैकी सर्वाधिक फलक अंधेरी, जोगेश्वरी पश्चिमेत आहेत, तर तब्बल १७९ फलक रेल्वेच्या हद्दीत असून, या फलकांसाठी पालिकेकडून परवानगी घेतलेली नाही, असे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.
मुंबईतील एकूण जाहिरात फलक-
१३४- अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम भाग
१३१- ताडदेव, ग्रॅण्ट रोड परिसर
१२९- वांद्रे, खार पश्चिम
१२२-अंधेरी, जोगेश्वरी पूर्व
रेल्वेच्या हद्दीतील सर्वाधिक जाहिरात फलक हे वडाळा, शिवडी परिसराचा समावेश असलेल्या पालिकेच्या ‘एफ’ उत्तरमध्ये आहेत. त्यामुळे यामधील अनधिकृत होर्डिंग्जवर पालिका केव्हा कारवाई करणार, याकडे आता लक्ष आहे.