मुंबईत जवळपास ८० केंद्रे सज्ज; आजपासून ज्येष्ठ, आजारी व्यक्तींना मिळणार लस!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 06:15 AM2021-03-01T06:15:41+5:302021-03-01T06:15:52+5:30
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील इतर १९ लसीकरण केंद्रांमध्ये २ मार्चपासून तिसऱ्या टप्प्यातील विनामूल्य लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. तर शहर, उपनगरात ५३ खासगी रुग्णालयांमध्ये टप्प्याटप्प्याने लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मार्चपासून सुरू होत आहे. मुंबई महापालिकेच्या पाच तर खासगी रुग्णालयांतील तीन कोविड लसीकरण केंद्रात सोमवारपासून लसीकरणाला सुरुवात होईल.
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील इतर १९ लसीकरण केंद्रांमध्ये २ मार्चपासून तिसऱ्या टप्प्यातील विनामूल्य लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. तर शहर, उपनगरात ५३ खासगी रुग्णालयांमध्ये टप्प्याटप्प्याने लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येईल,
तर ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त व्यक्तींनाही लस देण्यात येईल. महापालिकेच्या रुग्णालयांसह केंद्र, राज्याच्या अखत्यारितील निर्धारित रुग्णालयांमध्ये लसीकरण विनामूल्य आहे, तर खासगी रुग्णालयांत लसीकरणासाठी प्रत्येक मात्रेसाठी २५० रुपये आकारले जातील.
खासगी रुग्णालयांपैकी ज्या रुग्णालयांमध्ये जनआरोग्य योजना वा केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्यविमा योजना राबविण्यात येत आहेत, अशा खासगी रुग्णालयांना लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे.
राज्यात ६५० केंद्रे
१ मार्चपासून राज्यात ५५० शासकीय व १०० खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. ४५ वर्षापेक्षा जास्त आणि ६० वर्षापर्यंत ज्यांना व्याधी आहेत अशांचा एक गट करण्यात आला आहे. त्यांना आजाराचे कारण देऊन नाव नोंदणी करता येणार आहे.
अशी करा नोंदणी... ही न्या कागदपत्रे
nआजार असलेल्या व्यक्तीने वैद्यकीय सेवा देणाऱ्याचे प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक आहे. ६० वर्षांवरील नागरिकांनी वयाबाबतचा पुरावा सादर करावा लागेल.
nकोविन डिजिटल मंच १ मार्च रोजी सकाळी ९
वाजल्यापासून खुला होईल.
nकोविन डिजिटल मंचावर नोंदणी करणे आवश्यक आहे.
nआगाऊ नोंदणी करता येईल.
nलसीकरण केंद्रात
लसीकरणापूर्वी नोंदणी करता येऊ शकेल.
nनोंदणी प्रक्रिया सुरळीत होईपर्यंत केंद्रावर गर्दी
करू नये.
nनोंदणी करताना आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा पॅनकार्ड अशी कागदपत्रे सोबत न्यावीत.
येथे विनामूल्य लसीकरण
बी. के. सी. जम्बो रुग्णालय, वांद्रे
मुलुंड जम्बो कोविड रुग्णालय, मुलुंड
नेस्को जम्बो कोविड रुग्णालय, गोरेगाव
सेव्हन हिल्स रुग्णालय, अंधेरी
दहिसर जम्बो रुग्णालय, दहिसर
खासगी रुग्णालये
एच. जे. दोशी हिंदू सभा रुग्णालय, घाटकोपर
के. जे. सोमय्या वैद्यकीय महाविद्यालय, सायन
एस. आर. सी. सी. चिल्ड्रन रुग्णालय, महालक्ष्मी