लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा दिनांक १ मार्चपासून सुरू होत आहे. मुंबई महापालिकेच्या पाच तर खासगी रुग्णालयांतील तीन कोविड लसीकरण केंद्रात सोमवारपासून लसीकरणाला सुरूवात होईल. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील इतर १९ लसीकरण केंद्रांमध्ये २ मार्चपासून तिसऱ्या टप्प्यातील विनामूल्य लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. तर शहर, उपनगरात ५३ खासगी रुग्णालयांमध्ये टप्प्याटप्प्याने लसीकरणाला सुरूवात केली जाणार आहे.
सध्या खासगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्र केवळ त्याच रुग्णालयांतील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहील. फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले नसल्यास ते लसीकरण करुन घेऊ शकतात.
तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील व्यक्तिंचे लसीकरण करण्यात येईल तर ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त व्यक्तिंनाही लस देण्यात येईल. महापालिकेच्या रुग्णालयांसह केंद्र, राज्याच्या अखत्यारीतील निर्धारित रुग्णालयांमध्ये लसीकरण विनामूल्य आहे तर खासगी रुग्णालयांत लसीकरणासाठी प्रत्येक मात्रेसाठी २५० रुपये आकारले जातील.
खासगी रुग्णालयांपैकी ज्या रुग्णालयांमध्ये जनआरोग्य योजना वा केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्यविमा योजना राबविण्यात येत आहेत, अशा खासगी रुग्णालयांना लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. ५३ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणामुळे होणारे संभाव्य विपरीत परिणाम या बाबींचे सर्वेक्षण करुन लसीकरण सुरु करण्यात येईल.
....................
आजार असलेल्या व्यक्तीने वैद्यकीय सेवा देणाऱ्याचे प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक आहे. ६० वर्षांवरील नागरिकांनी वयाबाबतचा पुरावा सादर करावा लागेल.
- कोविन डिजिटल मंच १ मार्च रोजी सकाळी ९ वाजल्यापासून खुला होईल.
- कोविन डिजिटल मंचावर नोंदणी करणे आवश्यक आहे.
- आगाऊ नोंदणी करता येऊ शकेल.
- लसीकरण केंद्रात लसीकरणापूर्वी नोंदणी करता येऊ शकेल.
- नोंदणीची प्रक्रिया सुरळीत होईपर्यत केंद्रावर गर्दी करु नये.
- नोंदणी करताना आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा पॅनकार्ड अशी कागदपत्रे सोबत न्यावीत.
--------------
येथे विनामूल्य लसीकरण
बी. के. सी जम्बो रुग्णालय, वांद्रे
मुलुंड जम्बो कोविड रुग्णालय, मुलुंड
नेस्को जम्बो कोविड रुग्णालय, गोरेगाव
सेव्हन हिल्स रुग्णालय, अंधेरी
दहिसर जम्बो रुग्णालय, दहिसर
खासगी रुग्णालये
एच. जे. दोशी हिंदू सभा रुग्णालय, घाटकोपर
के. जे. सोमय्या वैद्यकीय महाविदयालय, सायन
एस. आर. सी. सी. चिल्ड्रन रुग्णालय, महालक्ष्मी