Join us

मुंबई पालिकेचे ७0% विद्यार्थी शालेय वस्तूंपासून अजूनही वंचित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 6:48 AM

तिमाही परीक्षा जवळ आली, तरी मुंबई महापालिकेच्या जवळपास ७० टक्के विद्यार्थ्यांना गणवेशासह शालेय वस्तू मिळालेल्या नाहीत.

मुंबई : तिमाही परीक्षा जवळ आली, तरी मुंबई महापालिकेच्या जवळपास ७० टक्के विद्यार्थ्यांना गणवेशासह शालेय वस्तू मिळालेल्या नाहीत. त्यामुळे आता सर्व वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी ठेकेदारांना ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे, अन्यथा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे.दरवर्षी पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, टिफिन बॉक्स, दप्तर, छत्री, पुस्तक आदी २७ शालेय वस्तू दिल्या जातात. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने, त्यापूर्वी या वस्तू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे अपेक्षित असते. मात्र, या वर्षी ७० टक्के विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेला नाही, तर ३३ टक्के दप्तर, २८ टक्के सॅण्डल्स, २५ टक्के बूट विद्यार्थ्यांना मिळालेले नाहीत.यापैकी बहुतांश वस्तूंच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया अद्याप सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे १५ आॅगस्टपर्यंत या वस्तू देण्याची असलेली मुदत वाढवून ५ सप्टेंबर करण्यात आली होती. मात्र, आता ही मुदतही ३० सप्टेंबरपर्यंत करून सर्व शाळांमध्ये वस्तू पोहोचविण्याचे निर्देश शिक्षण समितीने दिले आहेत. या वेळेसही ठेकेदारांनी दिलेल्या मुदतीत वस्तूंचा पुरवठा न केल्यास त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे.शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी मार्च महिन्यापासूनच निविदा प्रक्रिया सुरू होत असते. मात्र, या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया रेंगाळली होती. त्यानंतर, पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे या सर्व कामांकडे दुर्लक्ष झाल्याचा युक्तिवाद पालिका अधिकारी करीत आहेत. 

 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाशाळा