Join us

मेट्रो, भुयारी मार्गांसाठी ९२ हजार कोटींचे कर्ज; उत्पन्नाचे स्त्रोत घटले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 10:39 AM

बँका, वित्तीय संस्थांना एमएमआरडीएची साद.

मुंबई :मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मुंबई महानगरात हाती घेतलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. त्यातील ३७ प्रकल्पांसाठीच्या तब्बल १ लाख ३ हजार कोटी रुपयांच्या निधीचा प्रश्न एमएमआरडीएने नुकताच मार्गी लावला आहे. यात बँका आणि वित्तीय संस्थांकडून तब्बल ९२ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात येणार आहे. 

मुंबई महानगरात जलद प्रवासी वाहतुकीसाठी ३३७ कि.मी. लांबीचे मेट्रो जाळे तयार केले जात आहे. यासाठी १४ मेट्रो प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यातील ८ मेट्रो मार्गिकांच्या उभारणीचे काम सध्या सुरू आहे. त्याचबरोबर बोरीवली आणि ठाणेदरम्यानचा दीड तासांचा प्रवासाचा वेळ १५ ते २० मिनिटांवर आणण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या भुयारी मार्ग प्रकल्प, आरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह भुयारी मार्ग, ठाणे कोस्टल रोड, ठाण्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी विविध खाड्यांवर उभारण्यात येत असलेले खाडी पूल आदी प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. 

एकीकडे मोठ्या प्रमाणात प्रकल्प हाती घेतले असताना उत्पन्नाचे स्रोत मात्र घटले आहेत. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे या प्रकल्पांचा खर्च भागविण्यासाठी कर्ज काढण्याशिवाय अन्य पर्याय नाही. 

आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणला आरईसी लिमिटेड या संस्थेकडून १२ हजार कोटी रुपयांचे आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून (पीएफसी) १२ हजार कोटी रुपये अशा एकूण २४ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे तसेच राज्य सरकार या प्रकल्पांसाठी १० हजार ९९० कोटी रुपयांचे दुय्यम कर्ज देणार आहे. 

मेट्रोंसाठी तब्बल ३९ हजार कोटींचे कर्ज -

रुरल इलेक्ट्रीफिकेशन कॉर्पोरेशनकडून (आरईसी) आठ मेट्रो प्रकल्पांच्या कामासाठी ३० हजार ५९३ कोटी रुपये घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामध्ये मेट्रो ५, मेट्रो ६, मेट्रो ९, मेट्रो १०, मेट्रो १२, मेट्रो ४ आणि मेट्रो २बी या मार्गांचा समावेश आहे. 

एमएमआरडीए मल्टिलॅटरल डेव्हल्पमेंट बँकेकडून (एमडीबी) मेट्रो २ बी प्रकल्पासाठी ४ हजार ६९५ कोटी रुपये घेणार आहे. तर केएफडब्लू या वित्तीय संस्थेकडून मेट्रो ४ आणि ४अ साठी ४ हजार १९० कोटी रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. 

एमएमआरडीए किती कर्ज घेणार? (आकडे कोटी रु) 

१) ३०,५९३ कोटी रुरल इलेक्ट्रीफिकेशन कॉर्पोरेशन     

२) ५०,३०१ कोटी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन     

३) ४,६९५ कोटी  एमडीबी     

४) ४,१९० कोटी केएफडब्लू    

५) २००० कोटी एसबीआय कॉर्पोरेट कर    

टॅग्स :मुंबईएमएमआरडीएमेट्रो