Join us  

मुलुंडमधील ३ तलावांच्या स्वच्छतेसाठी ९८ लाखांचा खर्च; गणेशमूर्ती विसर्जनासाठी मनपाची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 11:41 AM

गणरायाच्या स्वागतासाठी मुंबापुरीत आतापासून लगबग सुरू झाली आहे.

मुंबई : गणरायाच्या स्वागतासाठी मुंबापुरीत आतापासून लगबग सुरू झाली आहे. स्वागतासह विसर्जन निर्विघ्न पार पडावे यासाठी मुंबई महापालिकेची तयारी सुरू झाली आहे. शहरात ठिकठिकाणी मूर्तींचे विसर्जन होते. त्याकरिता तलावातील गाळ उपसा करणे, साफसफाई करणे, आदी कामे हाती घेण्यात येत आहेत. 

 मुलुंड पूर्वेतील मोरया, गणेशघाट व भोईर तलावातील गाळ उपसा करण्यासह साफसफाईसाठी ९८ लाख १३ हजार ७२० रुपये खर्च करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घराघरांत ७ सप्टेंबरला गणरायाचे आगमन होणार आहे. देशात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो; परंतु मुंबईत गणेशोत्सवाची धूम वेगळीच असते. गणेशोत्सवात १० दिवस मुंबापुरी उजळून निघते. गणेशाच्या स्वागतासाठी पालिकेची तयारी सुरू झाली आहे. 

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन पालिकेकडून केले जाते. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती साकारणाऱ्या मूर्तिकारांना यंदाही मोफत शाडूची माती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पात्र कंत्राटदाराला मिळणार काम-

विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करणे, नैसर्गिक तलावातील गाळ उपसा करणे, साफसफाई करणे, आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया राबवली असून पात्र कंत्राटदाराला काम देण्यात येणार आहे. 

१९१ कृत्रिम तलाव-

मागील वर्षी पालिकेने १९१ कृत्रिम तलाव गणेश विसर्जनासाठी उपलब्ध करून दिले होते. यंदाही गिरगाव, दादर, जुहू, आदी ठिकाणी ही व्यवस्था करण्यात येणार आहे. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकागणेश विसर्जन