Join us

Navratri 2020: नवरात्रोत्सवासाठी मिठाई खरेदीसाठी लगबग; यंदा दुकानांमध्ये ग्राहकांची संख्या कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 5:12 AM

कोरोनाचा बसतोय फटका, मिठाईच्या दुकानांमध्ये सुरक्षेची सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. तरीदेखील दरवर्षीच्या तुलनेत ग्राहकांची संख्या रोडावल्याने मिठाई व्यापाऱ्याची काही प्रमाणात निराशा झाली आहे.

मुंबई : नवरात्रोत्सवासाठी मुंबईतील सर्व मिठाईची दुकाने सज्ज झाली आहेत. गणेशोत्सवा प्रमाणेच नवरात्रोत्सव देखील नियम व अटींचा बंधनात साजरा होत आहे. यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या नवरात्रोत्सवात ग्राहकांची संख्या कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवानंतर देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. 

यामुळे नागरिक अद्यापही बाहेरील खाद्यपदार्थांना नापसंती दर्शवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नवरात्रोत्सवासाठी अनेक भाविक मिठाई घेण्यासाठी दरवर्षी आवर्जून मिठाईच्या दुकानांमध्ये जात असतात. हेच लक्षात घेता दुकानदारांनी मिठाईच्या दुकानांमध्ये दरवर्षी पेढे, लाडू, बर्फी, मोदक व जिलेबी यांसारखे विविध गोड पदार्थ ठेवले आहेत.  नैवेद्य व प्रसाद यांसाठी लागणाऱ्या  मिठाईची ऑर्डर देण्यासाठी आठवडाभर आधीच मिठाईच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांची रेलचेल असते. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे मिठाईची मागणी कमी आहे. तसेच ग्राहकांची संख्या देखील कमी आहे. मिठाईच्या दुकानांमध्ये सुरक्षेची सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. तरीदेखील दरवर्षीच्या तुलनेत ग्राहकांची संख्या रोडावल्याने मिठाई व्यापाऱ्याची काही प्रमाणात निराशा झाली आहे.

गणेशोत्सवा प्रमाणे यंदाच्या नवरात्रोत्सवावर देखील कोरोनाचे सावट आहे. तसेच नियमावली देखील गणेशोत्सवा प्रमाणेच आहे. नागरिक घराबाहेर पडू लागले असले तरीदेखील बाहेरचे पदार्थ खाण्याबाबत विचार करीत आहेत. आम्ही आमच्या मिठाईच्या दुकानांमध्ये स्वच्छतेची व सुरक्षेची सर्व काळजी घेतली आहे. तरीदेखील ग्राहकांची संख्या दरवर्षीच्या तुलनेत कमीच आहे. अनेक जण गोड पदार्थ घरच्या घरीच बनवत आहेत. दरवर्षी अनेक मोठ्या मंडळांकडून तसेच आयोजकांकडून येणारी मिठाईची ऑर्डर अद्यापही आलेली नाही. दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या नवरात्रोत्सवात केवळ २५ टक्के व्यवसाय झाला आहे. - रितेश जगवानी, सतेज स्वीट्स, चेंबूर

सण व उत्सवांमध्ये नागरिक मिठाईला सर्वात आधी पसंती दर्शवितात. मात्र यावर्षीच्या मार्च महिन्यापासून पासून व्यवसायाचे नुकसान झाले आहे. अद्यापही मिठाईचा व्यवसायाने उभारी घेतली नाही. दसरा व दिवाळीत मिठाई खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या वाढेल अशी आम्हाला आशा आहे. दुकानात आम्ही सुरक्षेच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करीत आहोत. सॅनिटायझर, मास्क, फेस शील्ड, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर या सर्व गोष्टींना प्राधान्य देत आहोत. - अभयराज यादव, कृष्णा मिठाई, घाटकोपर

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यानवरात्री