मुंबई : पावसाळा पूर्व छोटे-मोठे नाले, कल्व्हर्टस, बॉक्स ड्रेन, रोड साइड ड्रेनमधील गाळ काढण्यासाठी मुंबई पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने कंबर कसली आहे. शहर विभागातील नालेसफाईसाठी निविदा प्रक्रिया सुरू केल्यानंतर आता पूर्व उपनगराकडे मोर्चा वळवला आहे. पूर्व उपनगरामध्ये दाट झोपडपट्ट्या असल्याने छोट्या-मोठ्या नाल्यांची अधिक लक्ष देऊन सफाई करावी लागते. यासाठी ७९ कोटी ५६ लाखांची निविदा मागविण्यात आल्या आहेत.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्यातील गाळ उपसा केल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात येतो. परंतु, पावसाळ्यात मुंबईतील अनेक भागांत पाणी साचल्याने मुंबई महापालिकेवर टीकेची तोफ डागली जाते. गेल्या वर्षी २०२३ मध्ये नाल्यातील गाळ उपसा करणे, मिठी नदीतील गाळ उपसा करणे यासाठी २८० कोटींचा खर्च करण्यात आला होता. परंतु, गेल्या वर्षी पावसाने दमदार हजेरी न लावल्याने पाणी तुंबण्याचे प्रमाण कमी झाले होते.
यामुळे पूरसदृश परिस्थिती :
मुंबईत २०२ लहान नाले आहेत. पूर्व उपनगरांमध्ये एकूण १०३.२६ किमी लांबीचे नाले आहेत. मोठ्या नाल्यांची संख्या ११४, तर लहान नाल्यांची संख्या ९९४ आहे, तर ३० ठिकाणी पाणलोट क्षेत्र आहे. इतकेच नाहीतर झोपडपट्टी परिसरातून वाहणारे नालेही याच परिसरात अधिक आहेत. यामुळे पावसाळ्यात या परिसरातील काही भागात पूरसदृश परिस्थिती दिसते.
असा होणार सफाईसाठी खर्च :
केंद्रीय एजन्सीकडून एल वॉर्ड, एम पूर्व आणि एम पश्चिम येथील गाळ काढण्यासाठी १७,०४,२८, ८०४
पूर्व उपनगरातील एन वॉर्ड, एस आणि टी वॉर्डमधील प्रमुख नाल्यांच्या सफाईसाठी १४, ३३,९८,५४६
एल व एम वॉर्डामधील पश्चिम द्रुतगती महामार्गालगत आणि त्या पलीकडच्या छोट्या रस्त्यालगतचे नाल्यांतील गाळ काढण्यासाठी १,१९,३,९२५ रुपये
एन, एस व टी वॉर्डामधील पश्चिम द्रुतगती महामार्गालगत आणि त्या पलीकडच्या छोट्या रस्त्यालगतचे नाल्यांच्या सफाईसाठी ३,३४,२४,०५० रुपये
एल वॉर्डमधील छोटे नाले, रस्त्यालगतचे नाले, बॉक्स नाले, पाइप नाले व कल्व्हर्टमधील गाळ काढणे व साफसफाई - ८,००,१०,९२० रुपये
एम पूर्व आणि पश्चिम येथील छोटे नाले, रस्त्या लगतचे नाले, बॉक्स नाले, पाईप नाले व कल्व्हर्ट, मधील गाळ काढणे व साफसफाई- १४,१७,९७,५९०
एन, एस आणि टी वॉर्डातील नालेसफाईची - १९,९३,०३,५००
एस वॉर्डातील भांडुपेश्वर कुंड व छत्रपती शिवाजी महाराज तलावातील गाळ काढणे व साफसफाई - १,५४,१४,०४८