मुंबईला पुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणात आठ टक्के पाणीसाठा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 10:00 AM2024-02-14T10:00:10+5:302024-02-14T10:01:19+5:30

पिण्याच्या पाण्यासाठी अतिरिक्त साथ न मिळाल्यास पाणीकपात अटळ.

about eight percent water storage in central distribution supplying in mumbai | मुंबईला पुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणात आठ टक्के पाणीसाठा 

मुंबईला पुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणात आठ टक्के पाणीसाठा 

मुंबई : १२० किलोमीटर अंतरावरून मुंबईची तहान भागवणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात यंदा मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० दिवसांचा पाणीसाठा कमी असल्याने मुंबईला जलसंकटाची चाहूल लागली आहे. एप्रिल-मे महिन्यात पाण्याच्या मागणीत वाढ होत असल्याने आणि  धरणातील सध्याची पाणीपातळी पाहता मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट अटळ असण्याची चिन्हे आहेत. 

राज्य सरकारच्या पाणीपुरवठा विभागाकडे पिण्याच्या पाण्याचा अतिरिक्त पुरवठा करण्यासाठी विनंती करणार आहोत. मात्र, ती मान्य न झाल्यास आम्हाला काही काळासाठी पाणीकपात करावी लागल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बदलत्या हवामानामुळे पाऊसही लहरी झाला आहे. त्यामुळे ७ जूनपासून बरसणारा पाऊस आता लांबणीवर पडत आहे. गेल्या वर्षी पावसाने धरण क्षेत्राकडे पाठ फिरवल्याने १ जुलै २०२३ पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली होती. परंतु, धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस बरसल्याने ८ ऑगस्टपासून पाणीकपात रद्द करण्यात आली होती. 

२०२२ मध्येही १० टक्के पाणीकपात केली होती. मार्च, एप्रिल व मे महिना उन्हाळी असून, पाण्याच्या पातळीत घट होण्याची चिन्हे आहेत. 

जून महिन्यात पावसाने हजेरी न लावल्यास पाणीबाणी ओढवू शकते. त्यामुळे जल विभागाकडून आतापासून नियोजन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष पाणी पुरवठा :

 मोडकसागर मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. 

 मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत ऑक्टोबरअखेरपर्यंत १४ लाख ४७ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. 

 परंतु, १३ फेब्रुवारी रोजी सातही धरणांत ७ लाख १४ हजार ६ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असल्याने आतापासून मुंबईवर पाणीकपातीचे वारे वाहू लागले आहेत.

Web Title: about eight percent water storage in central distribution supplying in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.