‘मातोश्री’वर शिवसेना नेत्यांची मंत्रीपदाबाबत खलबते
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 06:08 AM2019-05-28T06:08:37+5:302019-05-28T06:08:49+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पहिल्या टप्प्यात काही ठरावीक मंत्र्यांचा शपथविधी सोहळा येत्या ३० मे रोजी पार पडणार आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पहिल्या टप्प्यात काही ठरावीक मंत्र्यांचा शपथविधी सोहळा येत्या ३० मे रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी ५ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेत्यांची सुरू असलेली बैठक सव्वासात वाजता संपली. या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळातील शिवसेनेचे सहभागी होणारे मंत्री, तसेच राज्य मंत्रिमंडळ विस्तार व राज्यातील दुष्काळी परस्थितीबाबत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांबरोबर चर्चा केली. उद्धव ठाकरे मोदी सरकारमधील आपल्या मंत्र्यांची नावे येत्या बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतील, असे समजते.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर होणाऱ्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या बैठकीपूर्वी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख यांच्याबरोबर चर्चा केली. तसेच या बैठकीत शिवसेनेला मंत्रीपदे देण्याबाबत उद्धव ठाकरे व चंद्रकांत पाटील यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. या वेळी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भूमिका उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडल्याचे समजते. त्यानुसार मोदींच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री आणि लोकसभेचे उपसभापतीपद मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेनेतर्फे उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर, राज्यसभा खासदार संजय राऊत, बुलडाण्याचे खासदार प्रताप जाधव, यवतमाळच्या खासदार भावना गवळी, राज्यसभा खासदार अनिल देसाई, सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांची नावे आघाडीवर आहेत. संजय राऊत व कीर्तिकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते. तर दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांचा लोकसभेच्या उपससभापतीपदी विचार होण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग येथील शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. आगामी विधानसभा निवडणुका आणि कोकणात शिवसेनेला अधिक मजबूत करण्यासाठी विनायक राऊत यांचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा आहे. यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांचा खासदार म्हणून प्रदीर्घ अनुभव आहे. शिवसेनेतील एकमेव महिला खासदार म्हणून त्यांना संधी मिळू शकते.