लालबागच्या मार्केटला सुमारे ३५ कोटींचा फटका, कोरोनासह लॉकडाऊनचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 03:00 AM2020-05-22T03:00:06+5:302020-05-22T03:00:35+5:30

मुंबई : मुंबईचे सांस्कृतिक केंद्र म्हणून लालबागची ओळख आहे. खरेदी-विक्रीसाठी मुंबईकर आणि बाहेरगावचे ग्राहक येथे येतात. मात्र कोरोनामुळे मार्च ...

About Rs 35 crore hit the Lalbaug market, the result of lockdown with corona | लालबागच्या मार्केटला सुमारे ३५ कोटींचा फटका, कोरोनासह लॉकडाऊनचा परिणाम

लालबागच्या मार्केटला सुमारे ३५ कोटींचा फटका, कोरोनासह लॉकडाऊनचा परिणाम

Next

मुंबई : मुंबईचे सांस्कृतिक केंद्र म्हणून लालबागची ओळख आहे. खरेदी-विक्रीसाठी मुंबईकर आणि बाहेरगावचे ग्राहक येथे येतात. मात्र कोरोनामुळे मार्च महिन्याच्या उत्तरार्धापासून संपूर्ण लालबाग मार्केट बंद आहे. अडीच महिने ते बंद असल्याने या बाजारपेठेस सुमारे ३५ कोटींचा तोटा झाला आहे.
कोरोनामुळे येथील व्यापाऱ्यांना कसा फटका बसला, त्यांचे काय नुकसान झाले, व्यापारी नेमका काय विचार करत आहेत आणि भविष्यात काय होऊ शकते? या सर्व मुद्यांवर लालबागकरांच्या मदतीने ‘लोकमत’ने लालबाग मार्केटमधील व्यापाऱ्यांशी खास संवाद साधत त्यांचे म्हणणे जाणून घेतले.
लाडू सम्राटचे कमलाकर राक्षे म्हणाले, गुढीपाडव्याच्या आधीपासून लॉकडाउन लागू आहे. सण असल्यामुळे ३०० किलो श्रीखंडाची तयारी केली होती. ७० ते ८० किलो मिठाई तयार होती. सर्व फेकून द्यावे लागले.
भारतमाता सिनेमाचे मालक किरण भोपटकर यांनी सांगितले की, महिन्याला लाखो रुपये वीजबील येते. अडीच-तीन महिने झाले, नाहक बिल भरावे लागत आहे. प्रोजेक्टर मशीन वापराविना खराब होण्याची भीती आहे. भाड्याचे मशीन असतील तर त्याचे भाडे भरावे लागते. कर्जाचे हप्ते भरावे लागतात. थिएटरमधील बैठक व्यवस्था खराब होण्याची शक्यता आहे.
रेती, सिमेंटचे व्यावसायिक पारस गुप्ता म्हणाले, एप्रिल, मे महिन्यात मुलांना रजा असते. लोक घरकामे हाती घेतात. रेती, सिमेंटसारख्या बांधकाम साहित्याची मागणी वाढते. परिणामी आम्ही मार्चमध्येच साहित्य मागवले होते. आता ते पडून आहे.
नॅशनल ड्रेसचे मालक झेनुलभाई यांच्या म्हणण्यानुसार, एप्रिल आणि मे हे महिने लग्नसराईचे असतात. फेटे, सदरे अशा आॅर्डर बुक होतात. महाराष्ट्र दिन, गुढीपाडवा यावेळी ग्राहक आॅर्डर देतात. यावेळी सगळे साहित्य वाया गेले. ते पुढच्या वर्षीपर्यंत सांभाळावे लागेल. तोपर्यंत परिस्थिती काय असेल काहीच माहीत नाही.
तेजुकाया येथील चरण स्पर्शवाले येथे पादत्राणे विकली जातात. गिरिश रुपानी यांनी सांगितले, एप्रिल आणि मे आमच्यासाठी मोठे हंगाम असतात. यावेळी लग्नसराई असते. फेब्रुवारीतच आम्ही खरेदी करून ठेवतो. मात्र आता मोठे नुकसान झाले आहे. पावसाळी पादत्राणांची आधी होणारी खरेदीही झाली नाही. अतोनात नुकसान झाले.
पतंगे कलेक्शनचे संतोष पतंगे यांच्या म्हणण्यानुसार, आमच्याकडे लग्नसराईसाठी सदरा, तयार शर्टसाठी मागणी असते. मात्र यंदा हंगाम वाया गेला. लॉकडाउन कधी उठणार, पुढे काय होणार, झालेले आर्थिक नुकसान कसे भरून निघणार? असे अनेक प्रश्न सतावत आहेत.
आनंद नकाशे हे पूजा, लग्न साहित्य विकतात. त्यांनी सांगितले की, एप्रिल आणि मे महिन्यात लग्नसराईमुळे मोठ्या प्रमाणावर साहित्य खरेदी केली जाते. त्यासाठी आम्ही फेब्रुवारीत खरेदी केली होती. आता हे साहित्य श्रावणापर्यंत सांभाळून ठेवावे लागेल.

खामकर मिरचीवालेचे अमर खामकर यांच्या म्हणण्यानुसार, पुणे, नाशिकहून मार्च, एप्रिल महिन्यात मसाले बनविण्यासाठी ग्राहक येतात. आम्ही सर्व खरेदी करून ठेवतो. मात्र यावेळी सर्व हंगाम वाया गेला आहे. आता पावसाळा सुरु होईल आणि मिरची खरेदीला कोणी येणार नाही. परिणामी आमचा कच्चा माल वाया गेला.

लालबागची पूर्वीची ओळख गिरणगाव होती. संपानंतर गिरणगाव उद्धवस्त झाले आणि ती ओळख पुसली गेली. मात्र लालबागचा राजा, मुंबईचा राजा, तेजुकाया ही येथील ओळख आहे. गणेशोत्सव मंडळांनी येथील संस्कृती जपली. सांस्कृतिक केंद्र म्हणून असलेली ओळख कायम आहे. मुंबईचे सांस्कृतिक केंद्र हे लालबागच राहील. त्या अनुषंगाने साजरे होणारे सण, उत्सव याची एक मोठी बाजारपेठ लालबाग येथे आहे.
- रुद्रेश सातपुते, लालबागकर

Web Title: About Rs 35 crore hit the Lalbaug market, the result of lockdown with corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई