मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत मुंबई विभागाचा एकूण निकालाचा टक्का इतर विभागांच्या तुलनेत कमी असला तरी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमधील विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली आहे. मुंबई विभागातून परीक्षा दिलेल्या साधारण तीन लाख १९ हजार विद्यार्थ्यांपैकी एकूण तीन हजार ७७४ विद्यार्थ्यांना ९० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळाले आहेत.
यंदा राज्यभरातून सुमारे १५ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी आठ हजार ७८२ विद्यार्थ्यांनी ९० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळविले असून, त्यात मुंबईतील तीन हजार ७७४ विद्यार्थी आहेत.
२०२३च्या तुलनेत ९० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा १४ टक्क्यांनी वाढली आहे. दुसरीकडे मुंबईत कॉपीचे प्रकार राज्यात सर्वांत कमी होते; परंतु ९० आणि ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवण्यात मुंबई विभाग आघाडीवर आहे, असे मुंबई विभागीय मंडळाचे सचिव एस. आर. बोरसे यांनी सांगितले.
९४.२% - मुंबईतील विज्ञान शाखेच्या निकालात यंदा चार टक्क्यांनी वाढ झाली असून, हा निकाल ९४.२ टक्के इतका लागला आहे.
पदवीच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया २५ मेपासून-
१) मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त, मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये २०२४-२०२५ साठी पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीची प्रक्रिया २५ मेपासून सुरू करण्यात येणार आहे.
२) या प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक विद्यापीठामार्फत लवकरच जाहीर केले जाईल. तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रम, चार वर्षीय ऑनर्स, ऑनर्स विथ रिसर्च, इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री ॲण्ड मल्टीपल एक्जिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.