अटकपूर्व जामिनासाठी फरार पब मालकांची धावपळ, आज न्यायालयात याचिका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 05:57 AM2018-01-01T05:57:36+5:302018-01-01T11:48:35+5:30

कमला मिल कम्पाउंडमधील भीषण अग्नितांडवाला ९६ तासांचा अवधी उलटूनही, पबच्या फरार मालकांचा शोध पोलिसांना अद्याप घेता आलेला नाही. उलट भक्कम राजकीय वरदहस्त व निवृत्त सनदी अधिका-यांचे निकटचे नातेवाईक असलेल्या या आरोपींना अटकपूर्व जामीन अर्ज मिळावा, यासाठी अप्रत्यक्षपणे सहकार्य केले जात आहे.

 The absconding absconding owners of the Pub owners for anticipatory bail, petition in court today? | अटकपूर्व जामिनासाठी फरार पब मालकांची धावपळ, आज न्यायालयात याचिका?

अटकपूर्व जामिनासाठी फरार पब मालकांची धावपळ, आज न्यायालयात याचिका?

Next

- जमीर काझी
मुंबई : कमला मिल कम्पाउंडमधील भीषण अग्नितांडवाला ९६ तासांचा अवधी उलटूनही, पबच्या फरार मालकांचा शोध पोलिसांना अद्याप घेता आलेला नाही. उलट भक्कम राजकीय वरदहस्त व निवृत्त सनदी अधिका-यांचे निकटचे नातेवाईक असलेल्या या आरोपींना अटकपूर्व जामीन अर्ज मिळावा, यासाठी अप्रत्यक्षपणे सहकार्य केले जात आहे. त्यासाठी एक यंत्रणाच कामाला लागली असून, सोमवारी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
११ तरुणींसह चौदा निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असल्याप्रकरणी कमला मिलचे मालक रमेश गोवानी, ‘वन अबव्ह’चे संचालक क्रिपेश संघवी, अभिजित मानकर, जिगर संघवी व त्याच्या व्यवस्थापकाविरुद्ध, तसेच मोजोस ब्रिस्टोचे संचालक युग पाठक, ड्युक थुली यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी मानकर हा निवृत्त अधिकारी अशोक मानकर यांचा, तर युग पाठक हा पुण्याचे माजी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांचा पुत्र आहे. त्याशिवाय ‘मोजोस’ व ‘वन अबव्ह’मध्ये सुरक्षेबाबत योग्य यंत्रणा उभारली नसतानाही, महापालिकेकडून परवाने मिळवून देण्यात नागपूरमधील भाजपाच्या एका आमदाराने मोठी भूमिका बजावली आहे. त्याच्या दबावामुळे अनधिकृत बांधकाम व अनियमितता असतानाही, त्याकडे पालिकेकडून सोईस्करपणे दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात येते.
या दुर्घटनेला जबाबदार असणाºयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईचे आदेश दिले असले, तरी संबंधित मंडळी ‘सुपर हाय प्रोफाइल’ आहेत. त्यामुळे त्याविरुद्ध कारवाई करतानाही पोलीस पुरेशी सावधगिरी बाळगत आहेत. संबंधित मंडळी शुक्रवारी मुंबईतच होती. मात्र, पोलिसांनी त्यांना थेटपणे चौकशीला पाचारण न करता, पबच्या कर्मचाºयांना बोलावून त्यांचे जबाब नोंदविण्यात वेळ दडविला. या प्रकाराबाबत सर्व स्तरावरून टीकेची झोड उठू लागल्यानंतर, रमेश गोवानी व युग पाठकवर शनिवारी गुन्हा दाखल करण्याचे सोपस्कार पार पाडण्यात आले. त्याच वेळी त्यांच्यासह संघवी बंधू, मानकर यांना अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या कामाला लागण्याचा सल्ला वरिष्ठ अधिकाºयामार्फत देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळेच पोलिसांनी पहिले दोन दिवस थेट कारवाई न करता, घटनेचा पंचनामा व साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यावर भर दिला. त्याचप्रमाणे, मिल मालक व पबच्या संचालकांना ‘लुक नोटीस’ बजावून त्यांच्या शोधासाठी पथके बनविली आहेत.
सदोष मनुष्यवध, निष्काळजीपणा आणि एमआरटीपी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल असलेले हे आरोपी अटक टाळण्यासाठी ज्येष्ठ वकिलांशी संपर्क ठेवत आहेत. त्यासाठी काही पोलीस अधिकाºयांनी त्यांना मार्गदर्शन केल्याचे सांगण्यात येते. सोमवारी हे आरोपी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करतील, न्यायालयाकडून त्यांना दिलासा जरी मिळाला नाही, तरी जिल्हा न्यायालयात दाद मागण्याची सूचना केली जाईल, तेथील सुनावणी होईपर्यंतच्या कालावधीत संबंधितांना अटक न करण्याची सूचना पोलिसांना मिळेल, त्यामुळे जितके शक्य आहे, तेवढा वेळ अटक टाळण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

संघवीच्या दोघा चुलत्यांना अटक व जामीन
‘वन अबव्ह’चे संचालक असलेला जिगर संघवी व क्रिपेश संघवी यांना पलायन करण्यास सहकार्य केल्याबद्दल, त्याचे चुलते आदित्य महेंद्रमल संघवी (वय २९) व राकेश गणेशमल संघवी (४५) याला रविवारी भायखळा पोलिसांनी अटक केली. त्याच वेळी वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आला.
शुक्रवारी संघवी बंधू कमला मिलच्या कम्पाउंड परिसरातच होते. त्या वेळी त्याचे चुलते आदित्य संघवी, राकेश संघवी यांनी त्यांना तेथून आपल्या घरी नेले. त्या ठिकाणाहून त्यांना अन्यत्र निघून जाण्यास सांगून त्यासाठी मदत केली. पोलिसांनी पबच्या कर्मचाºयांकडे केलेले चौकशीतून ही बाब स्पष्ट झाल्याने, दोघांविरुद्ध आरोपीला आश्रय देणे व पळून जाण्यास सहकार्य केल्याबद्दल भादंवि कलम २१६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कागदोपत्री अटक दाखवून, पोलीस ठाण्यातच त्यांची वैयक्तिक बॉण्डवर मुक्तता करण्यात आली.

Web Title:  The absconding absconding owners of the Pub owners for anticipatory bail, petition in court today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.