Join us

रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका

By admin | Published: December 09, 2015 1:16 AM

सोमवारी रात्री शंटिंग करताना गार्डकडून लोकल चालविण्यात आली आणि सीएसटी स्थानकात बफरला लोकल धडकून अपघात झाला.

मुंबई : सोमवारी रात्री शंटिंग करताना गार्डकडून लोकल चालविण्यात आली आणि सीएसटी स्थानकात बफरला लोकल धडकून अपघात झाला. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाचा होणारे दुर्लक्ष उघडकीस आले आहे, तसेच शंटिंग (लोकल मागे-पुढे करण्याची चाचणी) करताना गार्डकडून अनेकदा लोकल चालविण्यात येत असल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. मुळात नियमानुसार मोटरमनकडूनच शंटिंग करण्यात येते. असे असतानाही शंटिंग करतानाचा नियमाचे पालन झाले नाही. शंटिंग करताना जागेची अदलाबदल करावी लागत असल्याने आणि तो त्रास वाचावा, म्हणून यासाठी शेवटच्या केबिनमध्ये असलेल्या गार्डकडूनच अनेकदा शंटिंग केले जात असल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. मध्य रेल्वेबरोबरच पश्चिम रेल्वे मार्गावरही अशा प्रकारे नियम डावलण्यात येतात. याबाबत रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, घडलेल्या घटनेची चौकशी केली जाणार आहे. मात्र, असे प्रकार अनेकदा घडत असल्याचे आता समोर आले आहे. ही गंभीर बाब असून, त्याची माहीतीही घेण्यात येईल.जलद प्लॅटफॉर्मवरच घडले अपघात२८ जून २0१५ मध्ये पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर लोकल बफरला धडकल्याची घटना घडली होती. या घटनेत पाच प्रवासी जखमी झाले होते. मात्र, ही घटना घडली तो दिवस रविवार असल्याने चर्चगेट स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण फारसे नसल्याने त्यामुळे अपघातचे प्रमाणही तेवढे नव्हते. या घटनेनंतर आता सोमवारी मध्यरात्री सीएसटी स्थानकात बफरला लोकल धडकल्याची घटना घडली. ही घटना प्लॅटफॉर्मवर क्रमांक पाचवर मध्यरात्री घडली. मुळात या दोन्ही घटना जलद मार्गावरील प्लॅटफॉर्मवरच घडल्या. (प्रतिनिधी)