Join us

वर्षा राऊत यांची ईडीच्या चौकशीला गैरहजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 4:08 AM

५ जानेवारीला हजर राहण्याचे नवे समन्स : एकनाथ खडसेंची आज चौकशी होणारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेनेचे ...

५ जानेवारीला हजर राहण्याचे नवे समन्स : एकनाथ खडसेंची आज चौकशी होणार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत पीएमसी बँकेतील ठेवीबाबत सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात मंगळवारी चौकशीला गैरहजर राहिल्या. त्यांनी ५ जानेवारीला हजर राहण्याबाबत पत्राद्वारे विनंती केली. ती ईडीने मान्य करून त्यांना ५ जानेवारीला हजर राहण्याचे समन्स बजाविल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, भोसरीतील कथित भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची बुधवारी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात येईल. त्यांना सकाळी अकरा वाजता कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे.

कोट्यवधीचा अपहार असलेल्या पीएमसी बँकेत वर्षा राऊत यांच्या खात्यात १२ वर्षांपूर्वी निकटवर्तीय प्रकाश राऊत यांच्याकडून ५० लाख रुपये भरण्यात आले होते. याबाबत प्रकाश राऊत व त्यांच्या पत्नीचा जबाब नोंदविण्यात आला असून ईडी गेल्या दीड महिन्यापासून वर्षा राऊत यांच्याकडे पत्रव्यवहार करून विचारणा करीत आहे. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना २९ डिसेंबरला ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजाविले होते. मात्र संजय राऊत यांनी भाजपकडून ही राजकीय सुडातून कारवाई सुरू असल्याची टीका केली. त्याचबरोबर ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र मंगळवारी त्यांच्या पत्नी वर्षा या ईडीच्या कार्यालयाकडे गेल्या नाहीत.

दरम्यान, एकनाथ खडसे बुधवारी हजर राहणार असल्याने कार्यालयाच्या परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

..................