मुंबई : शिवसेनेच्या वाशिम-यवतमाळ मतदार संघाच्या खासदार भावना गवळी या पुन्हा एकदा ईडीच्या चौकशीला गैरहजर राहिल्या आहेत. त्यांनी, वकिलामार्फत आणखीन १५ दिवसांची वेळ मागितली आहे. त्यामुळे ईडी आता यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टसह काही संस्थांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा ईडीला संशय आहे. त्यानुसार मनी लाँड्रिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन ईडी तपास करत आहे. ईडीने भावना गवळी यांना चौथ्यांदा समन्स बजावत ५ मे रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्या हजर झाल्या नाही. गवळी यांच्यावतीने वकील इंद्रपाल सिंग यांनी ईडी कार्यालयात हजेरी लावून, काही कागदपत्रे ईडीला दिली. तसेच, हजर राहाण्यासाठी १५ दिवसांची वेळ मागितली आहे. वकील सिंग यांनी दिलेल्या माहितीत, आम्ही तपास यंत्रणेच्या मागणीप्रमाणे महिला उत्कर्ष प्रतिष्ठान नावाच्या कंपन्यांशी संबंधित काही कागदपत्रे सादर केली आहेत. तर, उर्वरित कागदपत्रे ही स्थानिक वाशिम पोलिसांकडून घेण्यास सांगितले आहे. कारण, भावना गवळी यांनी याबाबत स्थानिक पोलिसांकडे तक्रार दिली होती, असे सिंग यांनी सांगितले.
माहिती अधिकारांतर्गत काही कागदपत्रे मिळवून ती कागदपत्रे तपास यंत्रणेला देण्यास तयार आहोत. त्यासाठी १५ दिवसांचा वेळ मागितला आहे. तर, दाखल आरोपपत्रात भावना गवळी यांचे आरोपी म्हणून नाव नाही, त्यामुळे त्यांना याप्रकरणात साक्षीदार म्हणून समन्स बजावले होते, असेही त्यांनी नमूद केले आहे.