पेपर पूर्ण सोडवूनही मिळाले शून्य गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 05:55 AM2019-04-27T05:55:01+5:302019-04-27T05:55:08+5:30
एलएलबीच्या विद्यार्थिनीचा आरोप
मुंबई : एलएलबी तिसऱ्या वर्षाच्या एका विद्यार्थिनीने पाचव्या सेमिस्टरची परीक्षा दिली. एका विषयांत अनुत्तीर्ण झाल्याचा निकाल तिला मिळाला. मात्र, पूर्ण पेपर व्यवस्थित सोडविल्यामुळे आपण नापास का झालो, असा प्रश्न तिने मुंबई विद्यापीठाकडे अर्जाद्वारे केला. तेव्हा १५ दिवसांत उत्तर देऊ, असे तिला सांगण्यात आले. मात्र, महिना उलटला, पुनर्तपासणीची वेळ संपून केटीच्या परीक्षेची वेळ जवळ आली, तरी विद्यापीठाकडून उत्तर मिळाले नसल्याचा आरोप या विद्यार्थिनीने केला आहे. नेहा सोहनी असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.
या आधीही विधि शाखेच्या पाचव्या सेमिस्टरच्या परीक्षेच्या एका पेपरला शून्य गुण मिळालेल्या विद्यार्थिनीला परीक्षेलाच गैरहजर दाखविण्याचा प्रकार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून समोर आला होता. या विद्यार्थिनीला अद्याप तिच्या पुनर्तपासणीचा पेपर मिळाला नसून, आता दुसºया विद्यार्थिनीला शून्य गुण मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे.
दरम्यान, पुनर्तपासणीसाठी पेपर देण्याची तारीख उलटून गेली असून, ९ मेपासून केटी परीक्षा सुरू होणार आहे. विद्यापीठाकडून उत्तर न मिळाल्याने, नेहाने केटी परीक्षेचा अर्ज भरला आहे. या संदर्भात मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीत आॅनलाइन पद्धतीमुळे चुका होत असतील आणि विद्यार्थी नापास होण्याचे प्रकार असे वाढत असतील, तर कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी ही आॅनलाइन स्क्रीन र्माकिंग पद्धत बंद करावी. मुंबई विद्यापीठ आणि कुलगुरू यांनी विद्यापीठाच्या सोईपेक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताकडे अधिक लक्ष द्यावे.
- सचिन पवार, अध्यक्ष,
स्टुडंट लॉ कौन्सिल