बेस्ट बचावची नुसतीच शोबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 07:06 AM2018-05-05T07:06:52+5:302018-05-05T07:06:52+5:30
स्वतंत्र बस मार्गिका, बस संख्येत वाढ आणि महापालिकेकडून मिळालेल्या आर्थिक पाठबळावरच बेस्ट उपक्रमाची गाडी भविष्यात रुळावर येईल. मात्र पालक संस्था असलेल्या महापालिका प्रशासनाची ताठर भूमिका आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभावच बेस्ट उपक्रमाला मारक ठरत असल्याची खंत वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केली.
मुंबई - स्वतंत्र बस मार्गिका, बस संख्येत वाढ आणि महापालिकेकडून मिळालेल्या आर्थिक पाठबळावरच बेस्ट उपक्रमाची गाडी भविष्यात रुळावर येईल. मात्र पालक संस्था असलेल्या महापालिका प्रशासनाची ताठर भूमिका आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभावच बेस्ट उपक्रमाला मारक ठरत असल्याची खंत वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केली.
प्रवासी भाड्यात नुकतीच झालेली वाढ, बसताफा कमी झाल्यामुळे बसफेऱ्यांमध्ये घट, ई तिकीट मशीनमध्ये बिघाड अशा असंख्य कारणांमुळे प्रवासी संख्येत दोन लाखांनी घट झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे बेस्टला आर्थिक स्थैर्य देण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. गेल्या दशकापासून आर्थिक स्थिती नाजूक असल्याने गतवर्षी बेस्ट भवनात वाहतूक तज्ज्ञांची बैठक बोलाविण्यात आली होती. अशा प्रकारच्या या पहिल्याच बैठकीत वाहतूक तज्ज्ञांनी बेस्ट उपक्रमाला जीवदान देण्याचे अनेक पर्याय सुचविले. मात्र ही बैठक म्हणजे राजकीय पक्षांची शोबाजीच ठरली. प्रत्यक्षात वाहतूक तज्ज्ञांनी सुचविलेल्या पर्यायांना केराची टोपलीच दाखविण्यात आल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
बेस्टचा फैसला आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारात
गेल्या वर्षी बोलाविलेल्या वाहतूक तज्ज्ञांच्या बैठकीत महाव्यवस्थापक आणि बेस्ट समिती अध्यक्षही उपस्थित होते. मात्र या चर्चेनंतर त्यावर अंमल करण्यात आला नाही. बसफेºया कमी करणे आणि कर्मचाºयांना त्यांची क्षमता वाढविण्यास बेस्ट प्रशासन सांगत आहे. मात्र या बदलामुळे काही परिणाम होणार नाही. बेस्ट प्रशासनाला याचे गांभीर्य नाही, असेच यावरून दिसून येते. तसेच राजकीय इच्छाशक्तीचा अभावच यात दिसून येत असल्याने आता मुख्यमंत्र्यांनीच यात हस्तक्षेप करून बेस्टला वाचवावे.
- ए.व्ही. शेनॉय, वाहतूक तज्ज्ञ
शेअर रिक्षाला
टक्कर द्या
फिडर मार्गावरील प्रवासी संख्या ७० टक्क्यांहून अधिक आहे. हेच प्रवासी शेअर रिक्षाकडे वळतात. बसची संख्या वाढविणे शक्य नसल्यास किमान कमी अंतरावरील प्रवासी भाड्यात घट करणे व १५ आसनी बसगाड्या आणण्याचा पर्याय सुचविला होता. असे प्रयत्न झाल्याशिवाय बेस्ट आर्थिक संकटातून बाहेर पडू शकणार नाही.
- प्रवीण छेडा, बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष
प्रवासी संख्येत सात वर्षांमध्ये
४० टक्क्यांनी घट
२००९-२०१०मध्ये ४३ लाख ७० हजार प्रवासी संख्या २०१८मध्ये २५ लाख ९० हजार एवढे प्रवासी उरले आहेत.
बेस्टच्या दर्शनी बाजूला असलेले इलेक्ट्रॉनिक बोर्ड बंद असणे, कंडक्टरकडे असणाºया ट्रायमेक्स मशीनमध्ये बिघाड, तिकीट प्रणाली सदोष, कमी झालेल्या बसफेºयांमुळे प्रवासी संख्येत घट झाली आहे.
बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बसगाड्यांची अचूक वेळ कळण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तसेच एकात्मिक तिकीट प्रणाली अंतर्गत नवीन मशीन उपलब्ध होऊन ही समस्या लवकरच सुटेल, असे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी सांगितले.
ती राजकीयच बैठक
बेस्टला वाचविण्यासाठी बोलावलेली बैठक राजकीयच ठरली. त्यावर पुढे काहीच अंमल झाला नाही. बेस्टला नफ्यात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होण्याची गरज आहे. यासाठी स्वतंत्र बसमार्गिका, बस गाड्यांच्या संख्येत वाढ असे अनेक प्रयत्न केल्यास बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ होईल. - सुधीर बदामी, वाहतूक तज्ज्ञ