उदंचन केंद्राद्वारे १० तासांत ४४२ कोटी लिटर पाण्याचा उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:06 AM2021-07-19T04:06:05+5:302021-07-19T04:06:05+5:30
मुंबई : शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचे पाणी खेचून ते समुद्रात टाकण्याचे काम महापालिकेच्या उदंचन केंद्राद्वारे करण्यात आले. या ...
मुंबई : शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचे पाणी खेचून ते समुद्रात टाकण्याचे काम महापालिकेच्या उदंचन केंद्राद्वारे करण्यात आले. या १० तासांच्या कालावधी दरम्यान ४४२.३५ कोटी लिटर पाणी पंपाद्वारे खेचून ते समुद्रामध्ये टाकण्यात आले आहे. ज्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली आहे.
पाण्याचा निचरा होण्यासाठी ६ उदंचन केंद्र कार्यान्वित आहेत. या केंद्रांमध्ये मोठ्या क्षमतेचे एकूण ४३ उदंचन संच अर्थात पंप कार्यरत आहेत. हाजीअली, लव्हग्रोव्ह (वरळी), क्लीव्हलँड बंदर (वरळी गाव), ब्रिटानिया (रे रोड), ईर्ला (जुहू) आणि गज़धरबंध (सांताक्रुज पश्चिम) या ठिकाणी प्रत्येकी एक याप्रमाणे ६ उदंचन केंद्रे कार्यरत आहेत.
या सर्व केंद्रांमध्ये एकूण ४३ पंप आहेत. १७ जुलै रोजी रात्री ११ ते १८ जुलै रोजी सकाळी ९ पर्यंतच्या म्हणजेच सुमारे १० तासांच्या कालावधीदरम्यान ६ उदंचन केंद्रांद्वारे एकूण ४४२.३५ कोटी लिटर पाण्याचा उपसा करण्यात आला, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.
-----------------------
पावसाच्या पाण्याचा निचरा
हाजीअली -७४.५६ कोटी लिटर
लव्हग्रोव्ह - १०२.९८ कोटी लिटर
क्लीव्हलॅंड - ६८.९४ कोटी लिटर
ब्रिटानिया - ४१.७९ कोटी लिटर
इर्ला - ९५.७३ कोटी लिटर
गज़धरबंध - ५८.३६ कोटी लिटर