लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: औरंगजेबाचे कौतुक करणारे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांचे सदस्यत्व अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा निर्णय विधानसभेत बुधवारी घेण्यात आला. अधिवेशन संपेपर्यंत त्यांना विधानभवन आवारात येण्यासदेखील बंदी घालण्यात आली आहे. अबू आझमी यांच्या निलंबनावरून सत्ताधारी सदस्य प्रचंड आक्रमक झाले होते. विधानसभेत यावरून जोरदार गदारोळ तसेच घोषणाबाजीदेखील करण्यात आली.
अबू आझमी यांनी विधानभवन आवारात औरंगजेब किती चांगला शासक होता, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून मंगळवारी विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सत्ताधारी आमदारांनी आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून सदस्यत्व निलंबित करण्याची मागणी केली होती.
बुधवारी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निलंबनाचा प्रस्ताव मांडला. आझमींचे वक्तव्य गंभीर असून त्यांचे सदस्यत्व अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करावे तसेच त्यांना या कालावधीत विधानभवन आवारात प्रवेशबंदी करण्यात यावी, असा हा प्रस्ताव होता.
जुने दाखले देत सदस्यत्वच निलंबित करण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सभागृहातील कामकाजाचे जुने दाखले देत केवळ अधिवेशन संपेपर्यंत निलंबन न करता अबू आझमी यांचे सदस्यत्वच निलंबित करावे, अशी मागणी केली. काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार यांनी औरंगजेबाचे समर्थन कोणी करू शकत नाही. तो नालायकच होता; पण शिवरायांचा अपमान करणाऱ्या इतरांवर काय कारवाई करणार, असा सवाल केला.
न्यायालयाचा दाखला
चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारच्या काळात भाजपाचे १२ सदस्य निलंबित झाले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. तेव्हा न्यायालयाने निलंबन एका अधिवेशनापुरतेच करता येऊ शकते, असा निर्णय दिल्याचे स्पष्ट केले.
प्रस्ताव बहुमताने संमत
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अबू आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव मतास टाकला. बहुमताने हा प्रस्ताव संमत झाल्याचे नार्वेकर यांनी जाहीर केले.
तुम्ही नेहरूंचा निषेध करणार का? : मुख्यमंत्री
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रात खपवून घेतला जाणार नाही. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे आ. अबू आझमी यांनाही सरकार तुरुंगात टाकेल. परंतु, पंडित नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये शिवाजी महाराजांविषयी जे लिहिले आहे, त्यांचा निषेध करणार का? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत विरोधकांना केला. त्यांच्या या विधानामुळे गदारोळ झाला. परिणामी, कामकाज दहा मिनिटे तहकूब करण्यात आले.
विधान परिषदेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून आ. आझमी यांच्यावर कारवाईची मागणी केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “अबू आझमी यांना जेलमध्ये टाकतोच; पण जितेंद्र आव्हाड म्हणतात की, औरंगजेब होता म्हणून शिवाजी महाराज होते. तुम्ही आव्हाड यांच्याबाबत का बोलत नाही? पंडित नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये लेख लिहून शिवरायांचा अवमान केला. मग, त्यांचा निषेध करणार की नाही?’’