क्रू मेंबर्सना मारहाण, मग स्वत:चे कपडे काढले! विमानात महिलेचा हायवोल्टेज ड्रामा; नेमकं घडलं काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 07:51 AM2023-01-31T07:51:28+5:302023-01-31T07:52:33+5:30
विमान प्रवासात घडणाऱ्या वादग्रस्त घटना काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीत.
विमान प्रवासात घडणाऱ्या वादग्रस्त घटना काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. महिला प्रवाशावर दुसऱ्या प्रवाशानं लघुशंका केल्याचं प्रकरणं ताजं असतानाच आता एका प्रवासी महिलेनं विमानात धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई सहार पोलिसांनी सोमवारी एका ४५ वर्षीय महिला प्रवासी पाओला पेरुशियो हिला अटक केली आहे. ही इटलीची रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. तिनं विमान प्रवासात प्रचंड धिंगाणा घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. विमानाच्या क्रू मेंबर्सनं तिची मुंबई पोलिसांत तक्रार केली होती.
एअर विस्ताराच्या अबूधाबी-मुंबई फ्लाइटमध्ये हा प्रकार घडला आहे. महिलेनं कथित पद्धतीनं इकोनॉमी क्लासचं तिकीट असतानाही बिझनेस क्लासमध्ये बसण्याचा हट्ट धरला. केबीन क्रूनं महिलेला रोखलं असता तिनं हाणामारीला सुरुवात केली. त्यानंतर तीनं स्वत:चे कपडे काढण्यास सुरुवात केली. अर्धनग्न अवस्थेतच ती विमानात फिरू लागली. फ्लाइट मुंबई विमानतळावर लँड होताच एअर विस्तारा फ्लाइट यूके २५६ च्या केबीन क्रूनं पोलिसांना माहिती दिली आणि संबंधित महिलेला विमानतळावरुन अटक करण्यात आली. सोमवारी दोन वाजून तीन मिनिटांनी अबूधाबी विमानतळावरुन विमानानं मुंबईसाठी उड्डाण घेतलं होतं.
बिझनेस क्लाससाठी धरला हट्ट
सहार ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री जवळपास अडीच वाजताच्या सुमारास विमानाच्या इकोनॉमी क्लासमध्ये बसलेली एक महिला अचानक उठली आणि बिझनेस क्लासमध्ये जाऊन बसली. केबीन क्रूच्या सदस्यांनी तिच्याशी दोनवेळा संपर्क केला आणि आपल्या सीटवर जाऊन बसण्याची सूचना केली. तसंच कोणती मदत हवीय का? अशीही विचारणा करण्यात आली. पण महिला प्रवाशानं कोणतंही उत्तर दिलं नाही. तसंच आपल्या मूळ सीटवर जाण्यासही विरोध केला. त्यानंतर आरडाओरडा सुरू केला.
महिलेनं काढले कपडे
विमानाच्या महिला क्रू मेंबर्सनं जेव्हा महिला प्रवाशाला काही गैर करण्यापासून अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महिला प्रवाशानं एका क्रू मेंबरच्या चेहऱ्यावर ठोसा मारला. यात क्रू मेंबरला जबर दुखापत झाली. त्यानंतर महिला प्रवाशानं स्वत:चे कपडे काढण्यास सुरुवात केली आणि आरडाओरडा करू लागली. बराच वेळ विमान प्रवासात हा हंगामा सुरू होता. पुढे पहाटे ४.५३ मिनिटांनी विमान मुंबई विमानतळावर लँड झालं आणि या घटनेची माहिती आधीच विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. सुरक्षा अधिकाऱ्यांनी महिलेला ताब्यात घेतलं आणि मुंबई पोलिसांच्या ताब्यात सोपवलं आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर महिला प्रवाशाविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. तसंच तिच्या पासपोर्टमधील माहितीनुसार प्रवासी इटलीच्या सोंड्रियो येथील असल्याचं समोर आलं आहे.